पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात असंख्य बेकायदा होर्डिंग्जमुळे घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई हा एक फ़ार्स असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सखोल चौकशी करून अहवाल जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली आहे.
काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेकायदा होर्डिंग्ज कोसळल्यामुळे अपघात वाढत असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. “कायदेशीर आणि बेकायदेशीर होर्डिंगची तपशीलवार माहिती, जाहिरात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. नुकतेच पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे किवळे येथे होर्डिंग पडून ५ जणांना जीव गमवावा लागला. अशाच प्रकारे 4 दिवसांपूर्वी हिंजवडी परिसरात आणखी एक होर्डिंग दुर्घटना घडली होती. त्यामुळे शहरात अनधिकृत होर्डिंगची समस्या वाढत चालली आहे. अनेक भागात पालिका अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही फसवी आहे. आजही शहरातील अनेक भागात धोकादायक होर्डिंग्ज आहेत. शहरातील चौकाचौकात अनेक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. कारवाई करताना होर्डिंग चालकाला पालिका अधिकाऱ्याकडून मदत केली जात आहे."
यावर महापालिका कारवाई कधी करणार की नागरिकांच्या जीवाशी खेळणार, असा सवाल काटे यांनी उपस्थित केला आहे. अनेक होर्डिंग चालकांनी कारवाई टाळण्यासाठी त्यांच्या होर्डिंगवरील फ्लेक्स उतरवले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, होर्डिंगच्या घटनांमध्ये मरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: