प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क सारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


ठाणे :   फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालयेही उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरांमध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क सारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक आहे. या सुविधांचा लहानांपासून  ते ज्येष्ठांपर्यत सर्वांना आनंद घेता येईल व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 

नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्कचे नुतनीकरणाचा लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमीपूजन दुरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्याची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त श्री. नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार्कमधील लेझर शो चे उद्घाटन करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबई व महामुंबई क्षेत्रातील ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठा समुद्रातील महामार्ग असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे मुंबई ते नवी मुंबई, रायगड हा परिसर जवळ येणार आहे. 

राज्य शासन लोकांसाठी काम करत असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यात एकाच वेळी ७०० आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत. आजच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी नमो सन्मान योजना व एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाही चांगले काम करत आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देत आहे. येथील प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात बैठक घेऊ, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. 

आमदार व माजी मंत्री श्री. नाईक म्हणाले की, सिडको व औद्योगिक विकास महामंडळाला जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या व इतर मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात यावी. 

आमदार श्रीमती म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून कामे केल्यामुळे येथील विकास कामे झाली आहेत. नवी मुंबईत स्वतःचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच प्रकल्पग्रस्ताना कायमस्वरूपी नोकरीचा निर्णय घेण्यात यावा. 

आयुक्त श्री. नार्वेकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. 


नुतनीकृत वंडर्स पार्कची वैशिष्ट्ये

प्रवेश तिकिटे व राईडची तिकिटे स्मार्ट कार्ड पद्धतीने देणार 

पाच खेळण्याच्या जागी 7 खेळण्यांचा समावेश

सीसीटीव्हीची सुविधा

एलईडी लाईटची व्यवस्था

खुल्या तळ्यातील मल्टिमिडिया लेझर शो प्रमुख आकर्षण


टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट

अमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटची उभारणी

ऐरोली व कोपरखैरणे येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 दललि क्षमतेचे प्लांट

केंद्र, राज्य व महापालिका यांच्यामार्फत एकत्रितपणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे

या प्रकल्पामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन व अल्ट्रा व्हायोलेट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

पुनर्प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक संस्थाना देण्यात येणार

औद्योगिक संस्थांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये बचत

वाशी बहुद्देशीय इमारत

गरीब व गरजू लोकांसाठी वाशी सेक्टर 3 मध्ये बहुद्देशीय मंगल कार्यालयाची उभारणी

यामध्ये पार्किंग व्यवस्था, स्टोअर रुम, किचन रुम, तीन वातानुकुलित सभागृहे

स्पोर्ट क्लब, नगरवाचनालय, मुक्ती संघटना रुम, एनएममंडळ रुमची व्यवस्था

मध्यवर्ती ग्रंथालय

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती

तळमजला अधिक चार मजल्यांची पर्यावरण पूरक हरित इमारत

पुस्तकांचा प्रवास दर्शविणारे लक्षवेधी प्रदर्शन

ग्रंथविषयक उपक्रमांसाठी 130 आसन क्षमतेचे सभागृह

दृष्टिहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग

भाषा प्रयोगशाळा

व्ह्युईंग गॅलरीची आकर्षक रचना

मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्यकृती उपलब्ध होतील.

प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क सारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क सारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Reviewed by ANN news network on ५/३१/२०२३ १०:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".