पिंपरी : रात्रीच्यावेळी प्रवाशांना रिक्षात प्रवासी म्हणून घेऊन लुटणा-या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत.
दिलीप शिवराम गायकवाड रा. शिवाजी चौक, एसपी ऑफीस समागे, जनावरांचे दवाखान्यासमोर, लातूर आणि संदीप साहेबराव पवार, रा. स्वामी विवेकानंद शाळेसमोर, मु. साई, पो. महापुर, ता.जि लातूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भोसरी परिसरात या आरोपींनी काही दिवसांपूर्वी एका प्रवाशास रात्रीच्यावेळी रिक्षात घेऊन लुटले होते. याबाबतचा गुन्हा भोसरी पोलीसठाण्यात दाखल होता. मात्र, पोलिसांना लुटारूंचा सुगावा लागत नव्हता. फ़िर्यादीने सांगितलेल्या वर्णनाबरहुकूम सुमारे ३०० ते ४०० रिक्षा आणि १५० सीसीटीव्ही कॅमे-यांचे फ़ुटेज तपासून ही तपास लागला नाही. दरम्यान लुटलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता दिलीप गायकवाड याचे नाव पुढे आले. तो वाकड येथे एका कारवर ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रवासी असल्याचे भासवून वाकड येथे जात त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून संदीप पवार याला महाळुंगे, ता. खेड, जि . पुणे येथून पोलिसांनी अटक केली. तपासाअंती हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना समजले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक, कल्याण घाडगे, उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा.फौजदार राकेश बोयणे, अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: