पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांच्या गोहत्या प्रतिबंधक पथकाने एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि ४ गोळ्या जप्त केल्या आहेत. या गुन्हेगाराच्या अटकेमुळे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
राम परशुराम पाटील, वय २९ वर्षे रा.शिवशोभा बिल्डींग, जयमल्हार कॉलनी नं ६, थेरगाव, पुणे, मूळगाव टाकळी, ता. उदगीर, जिल्हा लातूर असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
गोहत्या प्रतिबंधक पथक २ मे रोजी रात्री २ वाजता रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर गस्त घालत असता त्यांना आरोपी पायी जात असताना दिसला. पोलिसांनी त्याच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये काय आहे याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना सॅकमध्ये दोन गावठी पिस्तुले आणि ४ गोळ्या आढळल्या. त्याच्याविरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये २०४/२०२३ क्रमांकाने भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५)(२७) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करून पोलीसकोठडी घेऊन व्यवस्थित चौकशी केली असता त्याने देहुरोड, वाकड, सांगवी, खडकी, हिंजवडी, रावेत पोलिसठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कारवाई सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल टोणपे, उपनिरीक्षक एम. डी. वरुडे, हवालदार शिंदे, संजय डामसे, नाईक प्रविण पाटील, विजय मोरे, गोडे, कॉन्स्टेबल सुहास डंगारे, पाटील, खंडागळे, माने, शिंगोटे, लेकुरवाळे तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहाय्यक निरीक्षक गणेश खारगे,कॉन्स्टेबल विशाल गायकवाड, शिपाई आकाश पांढरे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२३ ०७:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: