मनमाड : रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकामध्ये कारवाई करत लहान मुलांची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी ४ मानवी तस्करी करणा-यांना जेरबंद केले आहे. तर, ५९ मुलांची सुटका केली आहे.
दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये ही मुले आढळली. या मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन असल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलांना बिहारमधून महाराष्ट्रात आणले जात होते. या मुलांची पोलीसांनी सुटका केली असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. मुलांच्या तस्करीचा संशय येऊ नये म्हणून त्यांना मदरशाचा गणवेश घालण्यात आला होता. पकडण्यात आलेल्या तस्करांनी या मुलांना पूर्णिया येथून आणले होते. त्यांना सांगली येथे नेण्यात येत होते अशी कबुली तपास अधिका-यांकडे दिल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव येथे २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत सीडब्ल्यूसी जळगावला पाठवण्यात आले असून मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: