संगमेश्वर : आजीवली, ता. संगमेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाला ठेकेदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना ११ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
प्रशांत प्रदिप शिर्के असे अटक केलेल्या सरपंचाचे नाव असून सचिन रमेश पाटोळे असे उपसरपंचाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्याने ग्रामपंचायत हद्दीत पाखाडी बांधण्याचे काम केले होते. त्याचे बिल अदा करण्यासाठी दोन्ही आरोपींनी ४० हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ११ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई निरीक्षक अनंत कांबळे, प्रवीण ताटे, सहाय्यक फ़ौजदार संदीप ओगले, हवालदार विशाल नलावडे, श्रेया विचारे, नाईक दीपक आंबेकर, शिपाई राजेश गावकर व चालक प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली.
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०५:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: