रत्नागिरी : कोकणातील सर्व
जिल्ह्यांच्या सर्वागीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण
क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला त्यानंतर ते बोलत होते.
कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर राहिलेला
आहे आणि तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण
करेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
या बैठकीस राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय
सामंत, बंदरे विकास मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय
शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच आमदार व माजी आमदार, खासदार आदींसह प्रमुख पदाधिकारी
आणि जिल्ह्यातील खाते प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले त्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा त्यांनी एका
पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देखील यावेळी जिल्हा परिषदेच्या योजनांचे सादरीकरण
केले.
आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम माजी खासदार निलेश राणे आदींसह
मंत्री महोदयांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे कोकणाच्या विकासाबाबत विविध प्रकारच्या
मागण्या केल्या. काजू आणि आंबा पिकाबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल यावेळी
सर्वांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय धोरणाबाबत
प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न
करण्याची गरज आहे तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय पॉलिसी बाबत अभ्यास करून
त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. कोकण विकासाचा बॅक ब्लॉक भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध
प्रयत्न केले जातील. राज्यातील गड किल्ल्यांच्या बरोबरच कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या
बाबत निर्णय घेतले जातील. केरळ प्रमाणे बॅक वॉटर मध्ये पर्यटन वाढीसाठी बांधा आणि वापरा
तत्वावर विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील.
कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, बीच डेव्हलपमेंट साठी प्रयत्न, सिंचनाच्या
सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद पुणे मार्गाच्या धरतीवर मुंबई ते सिंधुदुर्ग
हा एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात येईल असेही मुख्यमंत्री
बैठकीत म्हणाले.
रत्नागिरी येथील विमानतळ विकासाच्या कामाला गती देण्यात आली असून
यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे 77.7 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत
गतिमान विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी
आपल्या सादरीकरणात सांगितले. जागतिक स्तरावर येणारे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्ष 2023 म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
या निमित्ताने कृषी विभागातर्फे विशेष पोस्टर तयार करण्यात आले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ते मुख्यमंत्र्यांना
सादर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे प्रकाशन या बैठकीदरम्यान करण्यात
आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ग्रामदैवत भैरीबुवाचे
दर्शन
निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले
स्वागत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत माजी खासदार
निलेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री
उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सदानंद सरवणकर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी
आमदार सदानंद चव्हाण, फारुख शाह, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, पर्यटन
संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.
सकल हिंदु समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे यांनी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ
देवून स्वागत केले व प्रतापगडाच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाई बाबत आभारपत्र देवून
आभार मानले. याच पध्दतीने इतर गड-किल्यांवरील अनधिकृत बांधकामे, ढासळलेल्या किल्यांचे
सुशोभीकरण, लाऊडस्पीकर/भोंग्यावरुन होणारी अजान, हलाल सर्टिफाईड उत्पादन बंदी, धर्मांतरण-
लवजिहाद-गोहत्या बंदी याबाबत कडक कायदे करावेत या सर्व विषयाबाबत देखील समाजहितासाठी
ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती सकल हिंदु समाजाच्या वतीने या आभारपत्रातून
करण्यात आली.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, संजय जोशी, प्रदीप
साळवी, अमित काटे, देवेंद्र झापडेकर, वैभव पांचाळ, अक्षत सावंत, जयदीप साळवी आदी उपस्थित
होते.
रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार भरत गोगावले, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई डॉ. अभय वाघ, तसेच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ झाला.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन नियोजित इमारतीची वैशिष्ट्ये
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इमारत बांधकामासाठी रु. ४६ कोटी २१ लाख २१ हजार ३२७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारत तळ मजला अधिक २ मजले अशी आर.सी.सी. बांधकामाची असून मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरींग, सिव्हील व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स, इलेक्टिकल इंजिनियरींग, फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट अशा अभियांत्रिकीच्या ५ शाखांकरिता एकूण ३०० विदयार्थ्यांकरिता ३० वर्गखोल्या शाखांना आवश्यक ३४ प्रयोगशाळा व कार्यशाळा, ग्रंथालय व अभ्यासिका,प्रत्येक मजल्यावर पुरेशी स्त्री व पुरुष प्रसाधनगृहे, उद्वाहने, उपहारगृह व त्याचे स्वयंपाकगृह, विभागप्रमुखांचे कक्ष, प्राचार्य कक्ष, कॅम्पस मुलाखतीकरिता स्वतंत्र कक्ष, समिती कक्ष अशा महत्त्वाच्या वाबींचा समावेश आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यात 800 कोटीहून अधिक विकास कामांचे शुभारंभ झाले. परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा शुभारंभ सोहळा हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा झाला आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत होते, परंतु ही अडचण आता दूर झाली आहे. तरुण पिढीला चांगल्या उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही या शासनाची मुख्य भूमिका आहे. तरुणांना शिक्षणाचा भविष्यात योग्य उपयोग होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ते करार व निर्णय शासनामार्फत घेण्यात येत आहेत. थांबलेल्या भरती प्रक्रिया सुरू करून 75 हजार नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शासन औद्योगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे आभार मानले . कारण त्यामुळेच तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
हे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, माता-भगिनींचे, सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे हीच या शासनाची मुख्य भूमिका आहे.
उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे या संकुलाबद्दल माझ्या मनात विशेष भावना आहे. मी मागील काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतो. त्या वेळेला विविध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता उद्योग मंत्री आहे आणि हे संकुल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. विविध मोठ्या उद्योगांच्या बरोबर येथे कौशल्य विकासाचे विविध प्रयोग केले जाणार आहे. येथील स्थानिक विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ लागू नये यासाठी तंत्रशिक्षणाच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. आणि आज या इमारतीच्या रूपाने बरेचशे स्वप्न पूर्ण होत आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी आभार मानतो.
यावेळी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक केंद्र ठरणाऱ्या श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
माळनाका परिसरात असलेल्या या तारांगणाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्रिमीती प्रक्षेपण व्यवस्था या तारांगणात आहे. याच्या बांधकामास 11 कोटी 58 लाख खर्चुन हे उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी फित कापून आणि कोनशिलाचे अनावरण करुन याचे लोकार्पण केले.
इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीने याची उभारणी केली आहे. यात व्हिमिती व त्रिमीती प्रक्षेपणाची सोय आहे. देशातील या स्वरुपाचे पाचवे डिजीटल तारांगण रत्नागिरीत आकारास आहे. याच्या स्थापत्य कामावर ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च आला असून अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा व वातानुकूलीत सभागृह आणि प्रक्षेपण साहित्य यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे.
याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात ०१ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्चुन विज्ञान गॅलरी व ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन कला दालन उभारण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: