पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया बुधवारी काही संतप्त नागरिकांनी अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्या कक्षाची तोडफोड केली. दापोडी येथील एका महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करताना बदलला. त्यामुळे हा प्रकार घडला. संतप्त नातेवाईकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आल्याने वायसीएम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान या प्रकरणाची एका आठवड्यात चौकशी केली जाईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय ५७, रा. दापोडी) ही महिला मंगळवारी सायंकाळी अंगावर भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झाली. तिला सुरुवातीला औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी गायकवाड यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला
मृतदेहाचे मध्यरात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्या रात्री शवविच्छेदनगृहात तीन महिलांचे मृतदेह होते. पहाटे तीनच्या सुमारास स्नेहलता यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यांचे नातेवाईक गुजरात येथून येणार असल्याने त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार होते. त्यामुळे स्नेहलता यांचे नातेवाईक बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा त्यांची पाहणी करून गेले. त्यावेळी देखील स्नेहलता यांचा मृतदेह शवविच्छेदनगृहात होता मात्र अकरा वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. गाडीमधून घेऊन जात असताना तो मृतदेह स्नेहलता यांचा नाही हे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी शुभविच्छेदनगृहात जाऊन पाहणी केली असता स्नेहलता यांचा मृतदेह तिथे नसल्याचे उघड झाले.
त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात गोंधळ घातला नातेवाईकांनी डॉ. वाबळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. संतप्त नातेवाईकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अधिक कुमक मागविली त्यावेळी वायसीएम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. स्नेहलता यांचे नातेवाईक सकाळी 11 वाजता येण्यापूर्वी दोन मृतदेह देण्यात आले आहेत. त्या दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे स्नेहलता यांचा मृतदेह कुठे गेला याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
मृतदेहाची अदलाबदली; वायसीएममध्ये अधिष्ठाता कार्यालयाची तोडफोड
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०७:३४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ ०७:३४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: