पिंपरी : मावळ लोकसभेच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे मी येणारी लोकसभेची निवडणूक शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच लढविणार आहे असे सांगून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी राजकीय वर्तुळात चर्चेला चालना दिली.
खासदार बारणे यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरीच्या महिला संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, निलेश हाके, बशीर सुतार, देहूगावचे शहरप्रमुख सुनील हगवणे आदी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असा दावाही खासदार बारणे यांनी यावेळी केला.
बारणे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना जिल्ह्यांचे दौरे करायला सांगितले होते. मी तीन जिल्ह्यांचा दौरा केला. राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत आहे. पालकमंत्री शिवसैनिकांचे काम करत नाहीत. खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा तीव्र भावना शिवसैनिकांच्या होत्या.पक्षाचे नुकसान होत असल्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही पक्षप्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाही सर्वजण एकत्र राहू, शिवसेना भाजप युती राहिली पाहिजे, अशी भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला.
येत्या पिंपरीचिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना बांधणीसाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविली जाईल. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करुन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली जाईल.मुख्यमंत्री शिंदे शहरात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. आजपर्यंत मी पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही.आता ही चुकीची कामे रोखली जातील, असेही खासदार बारणे म्हणाले.
मी युतीतर्फे पुन्हा निवडणूक लढविणार : खासदार बारणे
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२२ ०५:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२२ ०५:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: