निखिल कवीश्वर यांची मागणी
लोणावळा : लोणावळा शहरात अवजड वाहनांमुळे होणारे अपघात व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी लोणावळा पोलीस व आयआरबी कंपनी यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर यांनी निवेदनाद्वारे शहर पोलिसांकडे केली आहे.
लोणावळा शहरातून जाणार्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांमध्ये अपघात वाढले आहेत. वरसोली टोलनाक्यावर टोल भरल्यानंतर अवजड वाहनांना कुसगाव टोलनाक्यावर पुन्हा टोल भरावा लागत असल्याने टोल वाचविण्यासाठी अवजड वाहने लोणावळा शहरातून जाण्याचा प्रयत्न करतात व अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गवळीवाडा नाका या वर्दळीच्या ठिकाणी आयआरबी कंपनीने रस्त्यामध्ये लावलेले दुभाजकांचे दगड सर्वत्र निघाले आहेत. रस्त्यावर छेद रस्त्यांवर लोखंडी ड्रम उभे केले आहेत, त्यांना कोठेही रेडीयम नसल्याने रात्रीच्या वेळी त्याला वाहने धडकत आहे. लाखो रुपयांचा टोल वसुल करणार्या आयआरबी कंपनीकडून यासर्व कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे तर अवजड वाहनांना शहरात बंदी असताना देखील लोणावळा पोलिसांकडून यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने अपघातांमध्ये नाहक सर्वसामान्यांचे जीव जात असल्याची भावना निखिल कविश्वर यांनी व्यक्त केली. लोणावळा शहर पोलीस, लोणावळा नगरपरिषद व आयआरबी कंपनी यांनी वरील परिस्थिती सुधरविण्यासाठी दोन दिवसात बैठक आयोजित करून तोडगा काढावा, शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक, अतिवेगाने जाणारी वाहने व अल्पवयीन मुलांकडून चालविली जाणारी वाहने यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी कविश्वर यांनी केली आहे.
चौकट :
घाटातून विरुद्ध दिशेच्या लेनने चालणारी वाहतूक न थांबवल्यास आंदोलन - डॉ. किरण गायकवाड
मुंबईवरून येणारी वाहतूक खंडाळा घाटातून खोपोली कडुन वाघजाई देवीमंदिर व राजमाची गार्डन येथून चुकीच्या दिशेने येते आणि त्यामध्ये बहुतेक अवजड वाहनं असतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यास्तव ही वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मावळ तालुका काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांनी दिला आहे. याशिवाय मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान खूप अपघात होत असून त्यात निष्पाप जीव जात आहे. हे अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक बसवावे व पोलिसचे खास पथक नेमावे अशी विनंती डॉ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे केली आहे.
अवजड वाहनांमुळे होणारे अपघात व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात
Reviewed by ANN
on
२/०६/२०२२ १०:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: