कामशेत : कामशेतमध्ये नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवू शकेल असा घातक वैद्यकीय घनकचरा कचराकुंड्या, घंटागाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे सफाई कामगार आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शहरातील देवराम कॉलनी हद्दीत महामार्गाच्या कडेला वापरलेले हॅन्डग्लोव्हज, इंजेक्शन, मास्क, औषधे आदी वैदयकीय घनकचरा नुकताच टाकण्यात आला असल्याचे दिसून आले होते. ग्रामपंचायतीचे सफाई कामगार कचरा उचलण्यासाठी आले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली.
ग्रामपंचायतीने याची दखल घेतली असून वैद्यकिय घनकचरा टाकणा-यांवर कारवाई केली जाईल असे परिपत्रक सरपंच रुपेश गायकवाड व ग्रामविकास अधिकारी यांनी काढले आहे. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
शहरातील अनेक दवाखान्यांचा सिरींज, बँडेज, ग्लोव्हज, सलाईन व औषधांच्या बाटल्या, रक्ताने माखलेले कापूस, पीपीइ किट असा वैद्यकीय कचरा सर्रास ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यामध्ये टाकला जात असल्याचे समजते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनास कामशेत ग्रामपंचायत व नागरिकांनी वेळोवेळी ही आणून दिली आहे. तरीही याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश दाभाडे, कामशेत ग्रामविकास अधिकारी यांनी बैठक घेऊन वैद्यकीय कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामशेतमध्ये सार्वजनिक ठिकाणी टाकला जातोय वैद्यकीय घनकचरा
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२२ १०:३८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: