पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन व अॅटलास कॉपको यांच्या विद्यमाने१८ ते ३० वयोगटांतील तरुणतरुणींसाठी सुमारे ९० प्रकारचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे.
यासाठी आतापर्यंत ४२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्र संचालक श्रुतिका मुंगी यांनी दिली. आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणतरुणींसाठी हे प्रशिक्षण असणार आहे. याचे उद्घाटन १२ जानेवारीला महापौरांच्या हस्ते होणार आहे. तसेच यात व्यावसायिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर कौन्सिलिंग, स्किलिंग कोर्स आदी गोष्टींचा समावेश असणार आहे.
पिंपरीतील सावित्रीबाई फुले संकुलात प्रशिक्षण होणार असून यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दहावी नापास असेल तर त्याचा १७ नंबरचा फॉर्म भरून घेऊन त्याला दहावी उत्तीर्ण केल्यानंतर प्रशिक्षण दिले जाते.
तसेच काम करत करत हे कोर्सेस शिकण्याची संधीही या ठिकाणी असणार आहे.
ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल रिपेअरिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर, नर्सिंग, ब्युटीपार्लर मेकअप आर्टिस्ट, ए.सी. रिपेअरिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग, होम ऑप्लिकेशन रिपेअरिंग, जावा, रिटेल सेल्स यासह एकूण ९० कोर्सेस आहेत. तसेच या विद्यार्थ्यासाठी अद्ययावत संगणक कक्षही असणार आहे.
आर्थिक दुर्बल युवकांसाठी पालिकेतर्फे ९० प्रकारचे प्रशिक्षण
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ११:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: