पालिकेतील लेखापरीक्षणासाठी निवृत्त अधिका-यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनेक वर्षे रखडलेल्या लेखापरिक्षणाला गती देण्यासाठी तीन सेवानिवृत्त अधिका-यांना सहा महिन्यांसाठी कामावर घेतले जाणार आहे. या अधिका-यांमध्ये लेखापरीक्षा अधिकारी किसन साळुंके, लेखाधिकारी राजेंद्र कडू व विशेष लेखापरीक्षक वर्ग २ आत्माराम माने यांचा समावेश आहे. महापालिकेचे मागील अनेक वर्षांचे लेखापरिक्षण रखडले आहे. त्यामध्ये अनेक गैरव्यवहार दडले असल्याचा आक्षेप पूर्वी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. अनेक वर्षांचे रखडलेले लेखापरिक्षण आणि कर्मचा-यांची कमतरता यामुळे या सेवानिवृत्त अधिका-यांना सहा महिन्यांसाठी कामावर घेतले जाणार आहे. सध्या पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षण कार्यालयामार्फत २०१० ते २०१८ या कालावधीतील विविध विभागांचे लेखापरीक्षण केले जात आहे. लेखापरीक्षणाचे कामकाज सहा गटांमार्फत करण्यात येत आहे. सध्या २०१५ -१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू झाले असून, हे कामकाज लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न मुख्य लेखा परिक्षक कार्यालयामार्फत सुरू आहे. परंतु कामाची अधिक व्याप्ती आणि अनुभवी कर्मचा-यांचा अभाव यामुळे कामास मर्यादा येत आहेत. त्यामुळे या तीन सेवानिवृत्त अधिका-यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुख्य लेखापरीक्षण विभागात नेमले जाणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार या अधिका-यांचे वेतन व भत्ते निश्चित करण्यात येणार आहेत.
पालिकेतील लेखापरीक्षणासाठी निवृत्त अधिका-यांची नियुक्ती पालिकेतील लेखापरीक्षणासाठी निवृत्त अधिका-यांची नियुक्ती Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ११:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".