पालिकेच्या तिजोरीची लूट थांबवा! राहुल कलाटे, प्रशांत शितोळे यांची मागणी
पिंपरी : स्वच्छ व पारदर्शी कारभाराची स्वप्ने शहरातील नागरिकांना दाखवून महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपने महापालिकेची अक्षरश: लूट चालविली असून सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे,डांगे चौक ते ताथवडे चौक आणि औंध ते रावेत या रस्त्यांच्या सुशोभीकरण आणि डांबरीकरणाच्या नावाखाली भाजपने चालविलेली 'लांडगे'तोड याचा ढळढळीत पुरावा आहे; असा आरोप शिवसेना गटनेता राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी बुधवारी केला.
या रस्त्यांची सद्यस्थिती आणि त्यांची कामे काढून आपली तिजोरी भरण्याचे सत्ताधा-यांचे मनसुबे प्रसारमाध्यमांच्यासमोर यावेत म्हणून कलाटे, शितोळे यांनी बुधवारी माध्यप्रतिनिधींना प्रत्यक्ष त्या रस्त्यांवर नेऊन वस्तुस्थिती दाखविली. महापालिकेने अत्यंत उत्तम स्थितीत असलेल्या सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे,डांगे चौक ते ताथवडे चौक आणि औंध ते रावेत या रस्त्यांच्या सुशोभीकरण आणि डांबरीकरणाच्या नावाखाली तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे.
यातील ४० कोटी रुपयांचे काम कोणतीही निविदा न मागविता थेटपद्धतीने एका ठेकेदाराला देण्याचा घाट घातला आहे. साधा एक खड्डाही नसलेल्या या रस्त्यावर महापालिका १०० कोटी रुपये का उधळू पहात आहे, असा प्रश्न कलाटे, शितोळे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबतही या दोघांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गरज नसलेली ही कामे काढून आणि विनानिविदा ४० कोटी रुपयांचे काम थेट पद्धतीने देऊन महापालिका प्रशासन सत्ताधा-यांना निवडणूक निधी गोळा करून देत आहे का? असे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर राज्यशासनाकडे या विषयी तक्रार केली जाईलच परंतु या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागून गल्लाभरू सत्ताधा-यांना मदत करणा-या महापालिका प्रशासनालाही उघडे पाडले जाईल.
काय आहे रस्त्यांची परिस्थिती?
औंध रावेत रस्ता चांगला आहे. रस्त्यावर एकही खड्डा नाही. हा रस्ता पुणे-पिंपरी-चिंचवडला जोडणारा आहे. हिंजवडीलाही या रस्त्यानेच जाता येते. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकसित केल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडीत आणि अपघातात भर पडणार आहे.
१४ कोटी ७४ लाख ६३ हजार ६०४ रुपये खर्चून सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईननुसार तयार करणे, १६ कोटी २७ लाख २७ हजार ४७४ रुपय खर्चून डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता तयार करणे आणि ३० कोटी ९६ लाख ४६ हजार ११२ खर्चून औंध ते रावेत रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे व अनुषंगिक कामे करणेअशी सुमारे ६२ कोटी रुपयांची कामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून यातील ३० कोटी रुपयांची सुरू करण्यास आयुक्तांनी कार्यादेशही दिला आहे. शिवाय तब्बल ४० कोटी रुपयांचे काम स्मार्ट सिटीच्या एका ठेकेदाराला थेट पद्धतीने देण्याचा घाट घातला आहे. आपण या उधळपट्टीला विरोध केल्यामुळे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असूनही सध्या थांबली आहे असे कलाटे म्हणाले. या रस्त्यांवर कोणत्याही कामाची गरज नसताना नाहक १०० कोटी रुपये उधळले जाणार आहेत. या प्रकारात सत्ताधा-यांबरोबरच काही अधिकारीही सामील असून त्यांनी आयुक्तांना अक्षरश: फसविले आहे. तर, सत्ताधारी निवडणूक निधी गोळा करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणत कामे काढत आहेत असेही कलाटे आणि शितोळे म्हणाले. यासाठी आयुक्तांकडे मागणी करूनही आयुक्त सुनावणीसाठी वेळ देत नसल्याचा आरोपही कलाटे, शितोळे यांनी यावेळी केला.
उत्तम स्थितीतील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल १०० कोटींची उधळपट्टी!
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ १०:२६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: