ऑनलाईन सभा घेण्याच्या शासकीय आदेशामुळे सभा रद्द
लोणावळा : सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली लोणावळा नगरपरिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा तसेच विशेष सभा कोविडच्या पार्श्वभूमीवर पारित करण्यात आलेल्या नविन शासकीय आदेशामुळे रद्द कराव्या लागल्या. ऐनवेळी प्राप्त झालेल्या या आदेशामुळे स्वच्छ सर्वेक्षणच्या दृष्टीने शहरासाठी आवश्यक असलेले काही विषय मंजुरीविना राहून गेल्याची खंत व्यक्ती करीत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
विद्यमान लोणावळा नगरपरिषद सभागृहाचा कार्यकाल सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी संपुष्टात आला. मात्र हा कालावधी संपण्यापूर्वी काही महत्त्वाचे विषय घेत याच दिवशी सकाळच्या सत्रात लोणावळा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. शिवाय दुपारी ३.३० वाजता एक विशेष सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही सभेचे अंजडे अनुक्रमे ३१ डिसेंम्बर तसेच ५ जानेवारी रोजी काढण्यात आले होते. त्यावेळी कोविड संदर्भात कोणतेही नियम वा आदेश सरकारकडून देण्यात आलेले नसल्याने या दोन्ही सभा ऑफलाईन पध्द्तीने घेण्यात येणार होत्या.
सोमवारी सकाळी सभेसाठी नगराध्यक्षा जाधव सभागृहात गेल्या असता मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी मिटिंग अयोजना संदर्भात काही शासकीय आदेश पारित झाले असल्याचे नगराध्यक्षा जाधव यांना सांगत दोन्ही सभा ऑफलाईन पद्धतीने घेता येणार नसल्याचे सूचित केले. सदर दोन्ही सभा ऑनलाइन पध्दतीने घेता येणं शक्य होते मात्र सभेच्या अजेंड्यावर ऑनलाईन बाबत कोणत्याही सूचना नसल्याने सभा रद्द झाल्या.
पाच वर्षे भाजपसोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसचा सभेवर बहिष्कार
संपूर्ण देशात आणि राज्यात एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष लोणावळ्यात मात्र मागील पाच वर्षांपासून एकत्र सत्ता उपभोगत होते. या कालावधीत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. पाच वर्षांपूर्वी अगदी पहिल्या दिवसापासून हातात हात घालत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत भाजप आणि काँग्रेसचा हा प्रवास सुरू होता. या पाच वर्षात झालेल्या विषय समित्यांच्या निवडी असो वा शेवटच्या वर्षात दर दोन महिन्यांनी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी असो, काँग्रेस आणि भाजपने एकमेकांचा हात सोडला नाही. मात्र पाच वर्षांची पूर्ण टर्म संपल्यावर बोनस मिळालेल्या २५ दिवसाच्या प्रवासात शेवटच्या काही तासात अचानक कुठंतरी माशी शिंकली आणि काँग्रेस नेत्यांना भाजपच्या नगराध्यक्षा मनमानी कारभार करत असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी शिवसेना, अपक्ष आणि काही भाजप नाराज नगरसेवकांना सोबत घेवून लोणावळा नगरपरिषदेच्या शेवटच्या दोन्ही सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच वरील दोन्ही सभा शासकीय आदेशाच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याने या बहिष्काराचा अपेक्षित असा राजकीय परिणाम झाला का? अशी चर्चा मात्र सध्या सर्व शहरात रंगली आहे.
लोणावळा नगरपरिषदेची सर्वसाधारण आणि विशेष सभा रद्द
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ११:०९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: