तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आणि आठ नगरसेवकांना गुरुवारी राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीसा दिल्यामुळे तळेगावातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. दुसरीकडे कार्यकाल संपण्याच्या शेवटच्या दिवशीच या नोटीसा देण्यात आल्याने हा हास्यास्पद विषय बनला आहे.
नोटीसा देण्यात आलेल्यांमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा चित्रा संदीप जगनाडे तसेच भाजपचे नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे, विभावरी रवींद्र दाभाडे, अमोल जगन्नाथ शेटे, संध्या गणेश भेगडे, शोभा अरुण भेगडे, तळेगाव जनसेवा विकास समितीचे संग्राम बाळासाहेब काकडे तसेच तत्कालीन नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांचा समावेश आहे.नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी महेश हंशेट्टी यांनी या नोटीसा दिल्या आहेत.
स्टेशन परिसरातील तळ्यामधील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामात अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या कारणावरून ठपका ठेवत या नोटीसा देण्यात आल्याअसल्याचे समजते.
तलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी वारेमाप खर्च करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे गेल्या होत्या. मावळच्या तहसीलदारांनी त्यावेळी तळेगाव नगरपरिषदेला २ लाख ३७६ ब्रास माती उत्खनन करुन वापर व विक्री केल्याबद्दल जबाबदार धरत त्याची नजराणा रक्कम व दंड असे एकूण ७९ कोटी ६४ लाख ९४ हजार ६०० रपये शासन जमा करण्याचे आदेश दिले होते.
या नोटीसीमध्ये नगराध्यक्षांवर वित्तीय अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना पुढील ६ वर्षासाठी नगरसेवक होण्यास अपात्र का ठरविण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली आहे. तर, स्थायी समितीचे सदस्य असलेल्या ७ नगरसेवकांनाही पुढील ५ वर्षासाठी नगरसेवक होण्यास अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस देण्यात आली आहे.आमदार सुनील शेळके यांनी या प्रकरणी पाठपुरावाही केला होता.
तळेगावच्या नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांना शासनाकडून कारणे दाखवा नोटीसा
Reviewed by ANN news network
on
१/०७/२०२२ १०:३९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: