पिंपरी :येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच भरघोस मतदान करून महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करणे हीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाची खरी भेट ठरेल असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी पिंपळे गुरव येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे, आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णु एकनाथ शेळके, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड यांच्यावतीने आयोजित हा महिला स्नेहमेळावा, रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे, माजी आमदार विलास लांडे, मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहाराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक मयूर कलाटे, सनी ओव्हाळ, नगरसेविका माई काटे, चंदा लोखंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, शोभा आदियाल, शिवाजी पाडुळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी पावसकर, शारदा मुंडे, विष्णु शेळके, तसेच उज्ज्वला ढोरे, साहेबराव तुपे, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, अस्मिता कांबळे, तृप्ती जवळकर पूजा काटे, लहुजी जगताप आदी उपस्थित होते
चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, पेट्रोल, गॅस सिलेंडर भाववाढ, तसेच खाद्यतेल, डाळींच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’अच्छे दिन’चे दाखवलेले स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. रुपाली ठोंबरे म्हणाल्या, की नुकताच आपण मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी विश्वास दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची कार्यकर्ती म्हणून काम करण्यास आपण तयार आहोत. ज्यांच्यासोबत 14 वर्ष काम केले, त्या भावांना आपले सांगणे आहे, की या बहिणीला आपण ओळखू शकला नाहीत, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की राष्ट्रवादीचे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जगताप यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे व सुरेखा लेंभे यांनी केले. तर आभार अरुण पवार यांनी मानले.
महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करणे हीच शरद पवार यांना वाढदिवसाची मोठी भेट : रुपाली चाकणकर
Reviewed by ANN news network
on
१२/२१/२०२१ १०:३९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: