पिंपरी चिंचवड महापालिकेत सल्लागार नेमणुकीचे सत्र सुरूच पेव्हिंग ब्लॉक्स, रस्ते दुभाजक बांधणीसाठीही सल्लागार

 



पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापती नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत किरकोळ कामांसाठी सल्लागार नेमणुकीच्या विषयांना मान्यता देण्यात आली. तसेच एका वादग्रस्त ठेकेदाराला नवा ठेका देण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
या बैठकीत 72 कोटी 66 लाख 51 हजार 658 रुपयांच्या विकासकामांना स्थायीने अनुमती दिली.
स्मार्टसिटीच्या कारभारामुळे नगरसेवक त्रस्त
या बैठकीत स्मार्टसिटीच्या कामांबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्मार्टसिटी आणि महापालिकेचे स्थापत्य व अन्य विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे शहरात सर्वत्र समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वैतागलेले नागरिक नगरसेवकांना सतावत आहेत. यामुळे त्रासलेल्या नगरसेवकांनी स्थायीच्या बैठकीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. स्मार्टसिटीचे अभियंता अशोक भालकर यांना पदाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठवावे अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.
सल्लागार नेमणुकीचे सत्र सुरुच
महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यानंतर अगदी क्षुल्लक कारणासाठीही सल्लागार नेमण्याचा पायंडा पडला आहे. यावर टीका झाल्यानंतर काही काळ हे प्रकार थंडावले होते. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत तब्बल 6 कामांना सल्लागार नेमणूक करण्याच्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. शाळांच्या इमारती बांधणे, रस्ते तयार करणे याबरोबरच पेव्हिंग ब्लॉक्स बसविणे, रस्ते दुभाजक तयार करणे या सारख्या किरकोळ कामानाही सल्लागार नेमण्यास स्थायीने मंजुरी दिली असून यामुळे महापालिका दरमहा लाखो रुपये पगार देऊन अभियंते कशासाठी पोसत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाच्या वतीने सभागृहाला उत्तर देताना महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले की सल्लागार नेमणुकीसाठी महापालिका प्रशासन लवकरच एक सल्लागार नियुक्ती धोरण तयार करेल मात्र आज झालेल्या बैठकीत सल्लागार नेमणुकीच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
सल्लागार नकोच; सभापतींचे मत
या सल्लागार निवडणुकीच्या संदर्भात स्थायी समितीचे सभापती एडवोकेट नितीन लांडगे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, सल्लागार नकोच अशी आमची भूमिका आहे पण, प्रशासनाने हे प्रस्ताव मांडल्यामुळे आम्हाला ते मंजूर करावे लागले आहेत. यापुढे एकाही सल्लागार निवडणुकीच्या प्रस्तावाला स्थायी समिती मंजुरी देणार नाही.
वादग्रस्त ठेकेदारावर पालिका मेहेरबान
महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय कर्मचारी ठेकेदारी तत्वावर पुरवण्याच्या कामात वादग्रस्त ठरलेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस या संस्थेला आज झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाकडील ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते, गटारे यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी ठेका मंजूर करण्यात आला. याची अंदाजपत्रकीय रक्कम 24 कोटी 38 लाख 50 हजार 867 रुपये होती. ठेकेदाराने हे काम पंधरा टक्के कमी दराने करण्याचे मान्य केल्यामुळे त्याला हा ठेका देण्यात आला. या ठेकेदारा विषयी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून दोनच दिवसांपूर्वी आयुक्तांना स्मरणपत्र देऊन योग्य कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सूचित केले आहे असे असूनही या ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सल्लागार नेमणुकीचे सत्र सुरूच पेव्हिंग ब्लॉक्स, रस्ते दुभाजक बांधणीसाठीही सल्लागार पिंपरी चिंचवड महापालिकेत सल्लागार नेमणुकीचे सत्र सुरूच पेव्हिंग ब्लॉक्स, रस्ते दुभाजक बांधणीसाठीही सल्लागार Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०१:०५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".