पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू : योगेश बहल

 



पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचार सुरु असल्याचा घणाघाती आरोप माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी ठेकेदारी तत्त्वावर पुरवण्याच्या कामात बोगस दस्तऐवज दाखल करून हे काम मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीकृपा एंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच या प्रकरणी चौकशी करून संबंधित महापालिकेचे अधिकारी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी बहल यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आवश्यक असणारे सर्व पुरावेही यांनी आयुक्तांकडे सोपविले असून आयुक्त याप्रकरणी कारवाई करण्यास चालढकल करत असल्याने दोनच दिवसांपूर्वी बहल यांनी त्यांना स्मरणपत्र देऊन या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
अशी स्थिती असताना काल गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत श्रीकृपा एंटरप्राईजेसला रस्ते गटारे यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे मुळात जो ठेकेदार वादग्रस्त आहे त्यालाच पुन्हा एकदा काम देण्यात आल्यामुळे याप्रकरणी महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या बाबत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.
या ठेकेदाराला ठेका मिळाल्याचे वृत्त कळताच बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने टक्केवारीसाठी महापालिकेची लूट चालविल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ज्या ठेकेदाराने वैद्यकीय विभागाच्या कामासाठी अनुभवाची बोगस कागदपत्रे सादर केली त्याच ठेकेदाराला बिनबोभाटपणे 20 कोटी 71 लाख रुपयांचे आणखी एक काम देण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या हितासाठी सुरू असलेला हा प्रकार सत्ताधारी भाजपाच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये सहभागी झालेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस या ठेकेदाराने अनुभवाची बोगस कागदपत्रे दाखल केल्याचे मी पुराव्यानिशी जनतेसमोर उघडकीस आणले होते. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्तांनाही याबाबत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर महिनाभरापासून महापालिका आयुक्तांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. चौकशीच्या नावाखाली या ठेकेदाराला सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या दबावाखाली पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.
एका बाजूला हा ठेकेदार महापालिकेची फसवणूक करत असताना त्याच ठेकेदाराला महापालिकेच्या आरोग्य विभागाचे तब्बल 20 कोटी 71 लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. बोगस कागदपत्रे देणार्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची गरज असताना याच ठेकेदाराला नव्याने कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला जातो. यातून सत्ताधारी भाजपाला सत्तेचा गैरवापर करून केवळ आर्थिक हित साध्य करावयाचे आहे, हेच सिद्ध होते.
स्थायी समितीने या कामाला मंजुरी देऊन भ्रष्टाचारी कारभारावर शिक्कामोर्तबच केले आहे. स्थायीसमितीने या कामाला मंजुरी दिली असली तरी प्रशासनाने श्रीकृपा एंटरप्रायझेसची चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करू नये. संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देऊ नयेत.
यानंतरही प्रशासनाने सत्ताधार्यांच्या दबावाखाली भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून ठेकेदाराला कामाचे आदेश दिल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार व महापालिका प्रशासनावर न्यायालयीन कार्यवाही केली जाईल, असा इशारा बहल यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू : योगेश बहल पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू : योगेश बहल Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०१:०७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".