पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी करावयाच्या व्यूहरचनेबद्दल विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख स्थानिक नेत्यांची बैठक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात नुकतीच झाली.
व्यूहरचना रचनेसाठी झालेल्या या गुप्त बैठकीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे आपल्याच हाती आली असे वाटल्यामुळे अत्यानंद झालेल्या आमदार बनसोडे यांनी ही बातमी स्वतःच प्रसार माध्यमांना पाठवून 'जितं मया' अशा थाटात या बैठकीची जी दवंडी पिटली त्यामुळे ते शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबर एकचे नेते आहेत असा संदेश कदाचित जनतेपर्यंत गेला असेल. पण, आजवर गाफील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता एकवटू लागले आहेत हे भाजपचे अध्वर्यू आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या त्वरित लक्षात येईल आणि ते त्याप्रमाणे आपले डावपेच आखतील एव्हढा सारासार विचारही आमदार बनसोडे यांच्या डोक्यात येऊ नये याचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही.
मुळात असल्या गाफीलपणामुळे आणि उंटावरून शेळ्या हाकण्याच्या वृत्तीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. वरिष्ठ नेते ज्यांच्यावर विसंबून होते त्यातील काही मंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या अतिमहत्त्वाकांक्षी स्थानिक नेत्यांनी वटवृक्षाच्या छायेखाली लहान रोपे वाढत नाहीत, त्यांची वाढ खुरटते हे ताडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपशी घरोबा केला. त्यांनी धोबीपछाड देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जागा कमी होतील.पण, सत्ता आपलीच येईल या भ्रमात होते. भाजपने जिंकलेल्या जागांचे आकडे पाहिल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला.
राष्ट्रवादीमधून आलेल्यांच्या जीवावर आणि गावकी, भावकीच्या डावपेचांच्या बळावर भाजपने महापालिकेची सत्ता काबीज केली खरी पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या खासदार असलेले गिरीश बापट हे तेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते. ते तर तेव्हा या शहराकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नव्हते. पालिकेतील विद्यमान सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांचे नाव महापौरपदासाठी विचाराधीन असताना ते बदलण्यासाठी बापट यांनी ज्या त्वरेने हालचाल केली त्याच्या शतांश लक्ष जरी या शहराकडे दिले असते तर, या शहराचे जे वाटोळे झाले ते झाले नसते. आज वर्तमानपत्रातून महापालिकेतील भ्रष्टाचाराची जी 'कोटीच्या कोटी उड्डाणे' जवळपास दररोज छापून येत आहेत ती आली नसती. वरिष्ठांचे लक्ष नसल्याने स्थानिक पदाधिकारी मोकाट सुटले. त्यामुळेच शहरातील नागरिकांना दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागत आहेत.
पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सक्षम विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका बजावेल अशी अपेक्षा होती. मात्र, एक दत्ता साने वगळता या पालिकेला विरोधीपक्ष नेता आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहात नव्हता. कारण महापालिकेतील बेनामी ठेकेदारी अबाधित ठेवण्यासाठी आणि नातीगोती जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शस्त्रे कधीच म्यान केली होती. त्याउलट विरोधी पक्षनेतेपद आणि शहराध्यक्षपद मिळवून तेव्हढे का होईना सत्तेचे सुख उपभोगण्याचा अनेकांचा प्रयत्न या काळात राहिला.
महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या सहाय्यकाना पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसून जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यास सांगितले. शहरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जर, अजित पवार यांना आपल्या स्वीयसहायकाला पिंपरी कार्यालयात बसवावे लागत असेल तर, स्थानिक नेत्यांची निष्क्रियता यातून अधोरेखित होते. अनेकवर्षे सत्तेच्या खुर्च्या उपभोगल्यामुळे त्याची समाजाशी असलेली नाळ तुटली आहे, किंवा त्यांना सध्याच्या परिस्थितीत राजकारण हातचे राखून करावयाचे आहे असे दिसते. बरे, अशा स्थितीत परस्पर कुराघोडीचे राजकारण थांबल्याचेही दिसत नाही.
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे काही स्थानिक कार्यकर्ते गेले. आपण पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घाला अशी विनंती त्यांना केली. शहरात पक्षपातळीवर नेतृत्वबदल होण्यासाठी इच्छूक असलेल्यांची ही खेळी असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होती. ज्यांनी 50 वर्षे देशाच्या राजकारणात घालविली त्या पवारांना ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची सूत्रे कोणा एकाच्या हाती असणार नाहीत या एकाच वाक्यात अनेक बंडोबाना थंडोबा केले.
या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या सर्व उलथापालथी सुरू असताना भाजपच्या गोटात मात्र त्यांच्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी त्यांच्या भागातील नगरसेवक, पदाधिकारी यांना कामाला लावले आहे. प्रसारमाध्यमांना मिळत असलेल्या बातम्यांवरून त्याला पुष्टीही मिळत आहे.
अशा परिस्थितीत विरोधकांनी लोकसंपर्कात आघाडी घेतली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व्यूहरचना कशी करावी याचाच विचार करण्यात आणि बैठक घेतली म्हणजे फार मोठी लढाई जिंकली असे भासविण्यात मश्गूल आहेत. बैठका घेऊन बौद्धिक कष्ट घेण्यापेक्षा जनतेत जाऊन शारीरिक कष्ट घेणे महापालिका काबीज करण्यासाठी अधिक महत्वाचे आहे हे या नेतेमंडळींना कधी कळणार हा खरा प्रश्न आहे.
निवडणूक येऊन ठेपली तरी अद्याप राष्ट्रवादीचे व्यूहरचनेवरच विचारमंथन!
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ ०१:०१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: