पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील महापौर कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि नगरसेवक अजित गव्हाणे देखिल सहभागी झाले होते.
या आंदोलनात आंदोलकांपैकी एकाला किरीट सोमय्या यांचा मुखवटा घालण्यात आला होता. त्याच्याकडे महापालिकेतील स्मार्टसिटी गैरव्यवहाराची फाईल सोपवून पालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या नंतर त्या मुखवटा घातलेल्या आंदोलकाने सोमय्या यांच्या शैलीत बोलून भाजपला क्लीनचिट दिली. यानंतर किरीट सोमय्या धाडस दाखवा, धाडस दाखवा,या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेनेच्या शिरुर संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विक्रांत लांडे, राजेश वाबळे, धनंजय आल्हाट आदींनी भाग घेतला.
यावेळी बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या, "महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात.
राज्यभर ईडी, सीबीआय च्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणांबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन तोंड बंद झाले आहे. आता शिवेसना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. महापालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात याहीपेक्षा तडाखेबंद आंदोलन केले जाईल" असा इशारा उबाळे यांनी दिला आहे.
शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”राज्यातील प्रत्येक गोष्टीच्या भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटीच्या कामांवर बोलावे.”
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “स्मार्ट सिटीमध्ये भाजपच्या राज्यातील नेत्यांनी शहरातील आमदारांना ‘फ्री हँड’ दिल्यामुळे हा भ्रष्टाचार घडला आहे. वारंवार भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या किरीट सोमय्या यांना पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारही दिसावा यासाठी हे आंदोलन केले आहे”.
पिंपरी चिंचवड स्मार्टसिटीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ १२:४३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: