छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसगावजवळील खवड्या डोंगरासमोरील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत १० जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, रोख रक्कम, मोबाइल आणि १५ वाहनांसह तब्बल ५० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जागा मालकासह एकूण ११ जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन पानबसरे याच्या मालकीच्या शेतातील वॉल कंपाउंडमध्ये छापा टाकला. तेथे सतरंजीवर गोलाकार बसून पैशावर ‘झन्ना मन्ना’ नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी शेख असद शेख अहेमद (वय ५१, रा. समतानगर), महेंद्र रतन सिरसाठ (वय २४, रा. बेगमपुरा), सुनिल अंबादास गाडे (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, तिसगाव), संदीप पूनमचंद बिरुटे (वय ३७, रा. नारळीबाग), अजय राजाभाऊ देशमुख (वय ३५, रा. सोनपेठ, जि. परभणी), लक्ष्मण रामराव जगताप (वय ६१, रा. वळदगाव), भारत नामदेव खंदारे (वय ४२, रा. बजाजनगर), राजकुमार ज्ञानदेव बाबर (वय ४०, रा. गेवराई, जि. बीड), राहुल राधेश्याम चव्हाण (वय ३५, रा. गेवराई, जि. बीड) आणि शिवाजी बाबासाहेब तवार (वय ३०, रा. कडेठाण, ता. पैठण) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह जागा उपलब्ध करून देणाऱ्या नितीन पानबसरे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार विलास मुठे यांनी फिर्याद दिली आहे.
कारवाईत १ लाख २७ हजार रुपये रोख, १२ मोबाइल हँडसेट (किंमत २ लाख ५६ हजार रुपये), ५ चारचाकी वाहने (किंमत ४० लाख रुपये), १० दुचाकी वाहने (किंमत ६ लाख ४० हजार रुपये) तसेच पत्त्याचे कॅट, प्लास्टिक कॉईन व सतरंजी असा एकूण ५० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Labels: Chhatrapati Sambhajinagar News, Waluj MIDC Police, Crime Branch Raid, Gambling Raid Maharashtra, Tisgaon News, Marathi News
Search Description: Crime Branch raids a gambling den in a farm near Tisgaon in Chhatrapati Sambhajinagar, detaining 10 gamblers and seizing property worth Rs 50.23 lakh including 15 vehicles; case registered against 11.
Hashtags: #ChhatrapatiSambhajinagar #WalujMIDC #CrimeBranch #GamblingRaid #MarathiNews #MaharashtraPolice
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२६ ०६:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: