रेवदंडा / रायगड: मोबाईल खरेदी करून देण्यास पालकांनी नकार दिल्याच्या रागातून १५ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीने घरातच कपाटात लपून बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याची घटना मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे घडली आहे. रेवदंडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि घराच्या सखोल तपासणीमुळे संबंधित मुलगी सुखरूप सापडली असून अपहरणाचा संशय दूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास बोर्ली येथील संबंधित मुलीचे आई-वडील मुरुड येथील शंकर मंदिरात गेले होते. या वेळी मुलगी घरी एकटी होती. यापूर्वी तिने आई-वडिलांकडे मोबाईल खरेदी करून देण्याचा हट्ट धरला होता; मात्र पालकांनी नकार दिल्याने ती रागात होती. याच रागातून तिने घरातील कपाटाच्या खणात कपड्यांच्या आडोशाला लपून बसत बेपत्ता झाल्याचा बनाव केला.
सायंकाळी पालक घरी परतल्यानंतर मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. नातेवाइकांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मुलगी अल्पवयीन असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्राथमिक चौकशीत घरातील अडगळीच्या जागा व कपाटांची सखोल तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेवदंडा पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी जाऊन घराची पाहणी केली. या तपासणीदरम्यान मुलगी कपाटात कपड्यांच्या आडोशाला लपून बसलेली आढळून आली. त्यामुळे ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे कुटुंबाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले.
Labels: Revdanda Police, Borli Murud News, Raigad News, Mobile Addiction Teenagers, Missing Girl Found Safe, Marathi News
Search Description: A 15-year-old girl in Borli, Murud taluka hid inside a wardrobe at home after parents refused to buy a mobile phone; Revdanda police found her safe during a thorough search.
Hashtags: #Revdanda #Murud #RaigadNews #MaharashtraPolice #ParentingAwareness #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२६ ०६:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: