डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अवमूल्यन व अपमान देशवासी खपवून घेणार नाहीत; माजी आमदार विजय गिरकर यांचा सीजेपी आणि काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई: जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५१ साली देशाला मतदानाचा अधिकार दिल्याचा खोटा दावा 'सीजेपी'चे नेते करत असल्याचा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय गिरकर यांनी सीजेपी व काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांचा कितीही उदो उदो करायचा असेल तर करा; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमूल्यन आणि अपमान करायचा प्रयत्न कुणी केला, तर आंबेडकरी जनता आणि संपूर्ण देशवासीय त्याचा तीव्र धिक्कार करतील," असा इशारा विजय गिरकर यांनी दिला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांचा अवमान केल्याबद्दल अभिजित दीपके यांच्याविरोधात देशभरातून निषेध व्यक्त केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार हा कोणत्याही एका राजकीय नेत्याची मेहेरबानी नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आणि समतावादी विचारांचा परिणाम आहे. १९४९ साली डॉ. बाबासाहेबांनी मसुदा तयार केलेले संविधान १९५० मध्ये देशाने स्वीकारले. त्या काळात अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत लोकशाही देशांमध्येही महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र, डॉ. आंबेडकरांनी कोणत्याही भेदभावाशिवाय पुरुषांसोबत महिलांनाही समान मतदानाचा अधिकार दिला. 'टाटा-बाटा'सारख्या बड्या उद्योगपतींपासून ते रस्त्यावर काम करणाऱ्या सामान्य श्रमिकांपर्यंत सर्वांना समान मताचा अधिकार देण्याचे क्रांतीकारक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. हे ऐतिहासिक सत्य नाकारून भ्रामक माहिती पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याबद्दल गिरकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
रस्त्यावरून देश चालवण्याच्या भूमिकेतून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न
सीजेपीच्या आंदोलनावर आणि नेत्यांवर टीका करताना विजय गिरकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले. सीजेपीच्या मोर्चात सहभागी न होता मुंबईच्या जनतेने या आंदोलनाला पूर्णपणे नाकारले आहे, असे ते म्हणाले.
योगेंद्र यादव यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गिरकर म्हणाले, "आता देशाचा कारभार संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून चालणार, असे वक्तव्य योगेंद्र यादव करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे; त्यांना देशात अराजकता, झुंडशाही, अतिरेक आणि हिंसाचार घडवून आणायचा आहे." संविधानाने निर्माण केलेले न्यायालय, निवडणूक आयोग, विधिमंडळ, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे अधिकार नाकारून या लोकांना थेट संविधानालाच विरोध करायचा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आणीबाणीच्या काळात लोकशाही संस्थांवर गदा आणली गेली होती, त्या इतिहासातून सर्वांनी धडा घेतला पाहिजे. भविष्यात कोणत्याही पक्षाच्या सरकारने लोकशाही संस्थांच्या अधिकारांना बाधा पोहोचवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यातून उभी राहिलेली लोकशाही व्यवस्था ही प्रत्येक भारतीयाची आहे. त्यामुळे संविधानाचे संरक्षण करणे, मतदारांचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी घडवून आणला डॉ. आंबेडकरांचा पराभव
पत्रकार परिषदेत बोलताना विजय गिरकर यांनी ऐतिहासिक घटनांचे दाखले देत काँग्रेसवर मतचोरी आणि डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचे गंभीर आरोप केले. विरोधी पक्षांकडून मतचोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत टीका केली जात असल्याचा संदर्भ देत त्यांनी इतिहासातील घटना उघड केल्या.
गिरकर यांनी सांगितले की, "देशातील पहिली मतचोरी नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी झाली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करण्यासाठी १० काँग्रेस कमिट्यांची मते पडली होती. मात्र, नेहरूंना एकही मत न मिळता महात्मा गांधींच्या प्रभावामुळे नेहरूंना पंतप्रधानपदी बसवण्यात आले. त्यानंतर दुसरी मतचोरी १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उत्तर मध्य मुंबई (तत्कालीन दक्षिण मध्य) मतदारसंघातून उभे राहिले, तेव्हा नेहरूंनी स्वतःच्या स्वीय सहाय्यक काजरोळकर यांना डॉ. आंबेडकरांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवले."
त्यावेळच्या कम्युनिस्ट पक्षाने मते बाद करण्याचे/कुजवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे सुमारे ७८ हजार मते बाद झाली आणि अवघ्या १० हजार मतांनी डॉ. बाबासाहेबांचा पराभव घडवून आणला गेला, अशी आठवण त्यांनी करून दिली. डॉ. बाबासाहेबांना पाडण्यासाठी स्वतः जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले होते, त्यांनी पैसा पुरवला आणि मतदारांमध्ये चुकीचा प्रचार केला. वेळोवेळी अपमानित करून काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना नाकारले आणि आताही १९५१ मध्ये नेहरूंनी मतदानाचा अधिकार दिल्याची खोटी माहिती पसरवून नेहरूंचे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी जोरदार टीका विजय गिरकर यांनी केली.
Labels:
Vijay Girkar,BJP Maharashtra,Dr BR Ambedkar,Jawaharlal Nehru,Constitution Of India,CJP Protest,Voting Rights HistorySearch Description:
Former MLA Vijay Girkar hits out at CJP and Congress over claims regarding voting rights in 1951, defends Dr BR Ambedkar's constitutional legacy.Hashtags:
#VijayGirkar #BJP #DrBRAmbedkar #IndianConstitution #MaharashtraPolitics #CJP #VotingRights
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: