गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा अवघ्या ८ तासांत जेरबंद


पुणे: पुण्याचे ग्रामदैवत प्रसिद्ध श्री कसबा गणपती मंदिरातील गाभाऱ्याची कडी तोडून दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अवघ्या ८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. संग्राम राजेंद्र जाधव (वय २९, रा. गडहिंगलज, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असला, तरी पोलिसांनी दाखवलेल्या जलद तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:३० ते ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५:२० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कसबा गणपती मंदिर परिसरात प्रवेश केला. मुख्य गाभाऱ्याची कडी तोडून आत प्रवेश करत त्याने तेथील लाकडी दानपेटी, मुख्य गाभाऱ्यासमोरील दोन लाकडी दानपेट्या आणि मारुती मंदिरासमोरील पत्र्याची दानपेटी लोखंडी रॉडच्या साहाय्याने उचकटली. या पेट्यांमधील अंदाजे ५०,००० ते ६०,००० रुपयांची रोकड चोरून तो पसार झाला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ड) व ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला सुगावा

ग्रामदैवत मंदिरातील चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सखोल तपासाचे आदेश दिले. तपास पथकातील अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे व प्रशांत पालांडे यांनी परिसरातील आणि येणाऱ्या-जाणाऱ्या विविध रस्त्यांवरील सीसीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली. संशयित इसमाच्या हालचाली टिपल्यानंतर पोलिसांनी कौशल्याने सापळा रचून संग्राम जाधव याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची यशस्वी कामगिरी अप्पर आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, उपायुक्त परिमंडळ-१ कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त फरासखाना विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने, निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगले, अंमलदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल औटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव व चेतन होळकर यांच्या पथकाने केली.

  • Labels: Kasba Ganpati Theft, Pune Police, Faraskhana Police, Kasba Peth Crime, Pune Crime News

  • Search Description: Faraskhana Police arrested Sangram Jadhav within 8 hours for stealing money from Kasba Ganpati Temple donation boxes in Pune.

  • Hashtags: #PunePolice #KasbaGanpati #FaraskhanaPolice #PuneCrime #BreakingNews #CrimeNews


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा