ज्ञानेश्वरी आणि शिवरायांची मराठी मुळातच अभिजात, तिला वेगळ्या दर्जाची गरज नाही; पिंपरी चिंचवड महापालिकेत सन्मानप्रसंगी पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे प्रतिपादन
पिंपरी: ज्या मराठी भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारख्या अजरामर ग्रंथाची रचना केली आणि ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष राजे होऊन गेले, त्या मराठी भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची अजिबात गरज नाही; ती भाषा मुळातच स्वाभाविकपणे अभिजात आहे, असे प्रतिपादन प्रतिभावान संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' आणि 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' सोहळ्यात ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, महापालिका अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बर्गडे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालपणीचे संस्कार आणि सावरकरांच्या पुस्तकाचा प्रभाव
सत्काराला उत्तर देताना हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या सांगीतिक आणि भाषिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "मराठीतील अभिजात काव्याला माझ्या परीने स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर केला. जेव्हा जेव्हा मला समृद्ध आणि भावगर्भ काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला मी चाली देत गेलो. कविता मला नेहमीच अंतर्मुख करते. बालपणी माझी आई मला गावाकडच्या अनेक गोष्टी सांगायची आणि नंतर तिने मला पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली."
आपल्या हातात आलेले पहिले पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले नाटक होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. लहानपणी कानावर पडलेल्या या समृद्ध भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार केले. शब्द, भाषा आणि स्वर यांचे नाते त्या बालवयातच मनात रुजले गेले. संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, संतांना लोक 'माऊली' म्हणतात, कारण ते ज्या मराठी भाषेच्या आश्रयाला बसले, त्या भाषेनेच कोट्यवधी लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले.
लता मंगेशकरांचे आशीर्वाद आणि कुटुंबाचा वारसा
आपल्या संगीतातील यशाचे श्रेय देताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, "माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अभिजात संगीताची निर्मिती केली. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे माझ्या संगीतसाधनेतून जे काही निर्माण होऊ शकले, त्यामागे त्यांचे फार मोठे योगदान आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या परंपरेतून मंगेशकर कुटुंबाला मिळालेला हा सांगीतिक वारसा अत्यंत मौल्यवान आहे."
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने केलेला हा सन्मान अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा असल्याचे सांगत त्यांनी महापालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
महापालिका प्रशासनाकडून गौरवोद्गार
महापालिका अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी स्वागतपर भाषणात हृदयनाथ मंगेशकर यांच्या योगदानाचा गौरव केला. "पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तुमच्या उपस्थितीमुळेच या सोहळ्याची उंची वाढली आहे. आमच्या शब्दांना किनारा असू शकतो, पण तुमच्या संगीताला आणि शब्दांना कोणताही किनारा नाही; तुम्ही स्वतः एक अथांग समुद्र आहात," अशा शब्दांत बगाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक करताना मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले की, मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन व्यवहारात आणि पुढील पिढ्यांच्या संस्कारात उतरवणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' साजरा केला जात आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य संगीताचा मिलाफ साधत मराठी शब्दांची संवेदनशीलता जपणारे हृदयनाथ मंगेशकर हे संगीतविश्वातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत.
छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
याच कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृत्त छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी या प्रदर्शमागील भूमिका मांडली. "पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि वृत्त छायाचित्रकार या स्तंभाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. छायाचित्रकाराने टिपलेले एक छायाचित्र संपूर्ण बातमीचे गांभीर्य आणि संदर्भ स्पष्ट करते. ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले.
Labels:
Hridaynath Mangeshkar,Pimpri Chinchwad Municipal Corporation,Abhijat Marathi Bhasha,PCMC News,Lata Mangeshkar,Pune Press Club,Marathi NewsSearch Description:
Padma Shri Pandit Hridaynath Mangeshkar honored by PCMC on Abhijat Marathi Bhasha Sanman Din. Read his views on Marathi language and Music legacy.Hashtags:
#HridaynathMangeshkar #MarathiLanguage #PCMC #AbhijatMarathi #PimpriChinchwad #MarathiNews #LataMangeshkar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: