शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

कल्याणीनगरमधील हॉटेल 'ईलाईट स्टे' मध्ये वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका


पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरातील एका नामांकित लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीच्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. कल्याणी नगर येथील "हॉटेल ईलाईट स्टे" या लॉजमध्ये छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी महिलांना देहविक्रीच्या दलदलीत ढकलणाऱ्या एजंटला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कल्याणी नगर, येरवडा येथील "हॉटेल ईलाईट स्टे" मध्ये एजंटद्वारे पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. बातमीचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ बातमीची पडताळणी सुरु केली. पोलिसांनी एक बनावट गिऱ्हाईक तयार करून हॉटेल ईलाईट स्टे येथे पाठवले आणि बातमीची शहानिशा करून खात्री पटवून घेतली.

बातमीची शहानिशा होताच पोलीस पथकाने हॉटेल ईलाईट स्टे वर अचानक छापा टाकला. या छाप्यात लॉजमध्ये तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी या तिन्ही महिलांची तात्काळ सुरक्षित सुटका केली. या प्रकरणी आरोपी सुनील साहेबराव कुऱ्हाडे (वय ३५ वर्षे, रा. राहुलनगर, निगडी, पुणे) याला घटनास्थळावरून तातडीने जेरबंद करण्यात आले.

याप्रकरणी १० सप्टेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे आरोपी सुनील कुऱ्हाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक  आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक निरीक्षक विक्रम मिसाळ, अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रानखान नदाफ, अविनाश कोंडे, किरण बरडे तसेच वैशाली खेडेकर व वैशाली इंगळे यांच्या पथकाने केली.


  • Labels: Pune Crime News, Pune Crime Branch, Kalyani Nagar Raid, Human Trafficking, Yerwada Police Station, Pune Police

  • Search Description: Pune Crime Branch raids Hotel Elite Stay in Kalyani Nagar, rescues three victim women forced into prostitution and arrests agent Sunil Kurhade.

  • Hashtags: #PuneCrime #PunePolice #CrimeBranch #KalyaniNagar #HumanTrafficking #Yerwada


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा