शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीत मोठे बदल


चिंचवड, १ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवादरम्यान शहरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याची आणि परिणामी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक शाखेने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी यासंदर्भातील अधिकृत अधिसुचना निर्गमित केली आहे.

हे वाहतूक बदल दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी १८.०० वाजता ते रात्री २२.०० वाजेदरम्यान आवश्यकतेनुसार लागू राहतील (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून).
 
प्रमुख वाहतूक विभागनिहाय बदल व पर्यायी मार्ग:

१. दिघी आळंदी वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: चहोली फाटा येथून मरकळ/शिक्रापूरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग: वाहने चहोली फाट्यावरून मॅजिक मिठाई स्वीट होमजवळ डावीकडे वळून तनिष ऑर्किड फेज-२, ग्लोबल हाईट्स, अपेक्स स्कूल व रिव्हर नेस्ट सोसायटीसमोरून डावीकडे वळून पुलावरून पीसीएस चौक (धानोरे फाटा) मार्गे पुढे जाऊ शकतील. शिक्रापूरकडून येणारी वाहने पीसीएस चौकातून रिव्हर नेस्ट सोसायटीमार्गे तनिष ऑर्किडवरून चहोली फाटा गाठू शकतील.

२. सांगवी वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: काटेपुरम चौकाकडून कृष्णा चौकाकडे तसेच साई चौकाकडून कृष्णा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

पर्यायी मार्ग: काटेपुरम चौकाकडून येणारी वाहने गजानन नगर मार्गाने किंवा नर्मदा गार्डन, माहेश्वरी चौक मार्गे जातील. साई चौकाकडून येणारी वाहने फेमस चौक - क्रांती चौक - कांकरीया गॅस एजन्सी - डायनोसर गार्डन किंवा माहेश्वरी चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

३. पिंपरी वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: जमतानी चौकाकडून पिंपरी गावाकडे आणि नवमहाराष्ट्र चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग: जमतानी चौकाकडून येणारी वाहने गेलार्ड चौक किंवा काळेवाडी/पवनेश्वर मंदिराकडे वळतील. नवमहाराष्ट्र चौकाकडून येणारी वाहने जाधव वडेवाले हॉटेलपासून डावीकडे वळून रहाटणी पुलाचा वापर करतील.

४. भोसरी वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: पुणे-नाशिक महामार्गावरील बाबर पेट्रोल पंप चौकाकडून भोसरी ओव्हर ब्रिजखाली जाण्यास (दुचाकी वगळून) मनाई असेल. तसेच फुगेवाडी दापोडी ओव्हर ब्रिजमार्गे शीतळा देवी चौकातून पुढे पुण्याकडे जाण्यास बंदी असेल.

पर्यायी मार्ग: भोसरी ओव्हर ब्रिजवरून धावडे वस्ती, सद्गुरूनगर चौकातून यु-टर्न घेऊन पुढे दिघी-आळंदीकडे जावे. शीतळा देवी चौकातून उजवीकडे वळून सांगवी मार्गे किंवा हॅरीस ब्रिज अंडरपासने बोपोडी मार्गे जावे.

५. चिखली वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: कृष्णानगर भाजीमंडई चौक व नेवाळेवस्ती कॉर्नर चौकाकडून साने चौकाकडे जाण्यास मनाई; तसेच मोशी चौक व वाय पॉईंट कुदळेवस्तीकडून अनुष्का सोसायटीकडे येण्यास बंदी.

पर्यायी मार्ग: कृष्णानगर मंडई व साने चौकादरम्यानच्या वाहनांनी कोहीनूर फॅशन दुकान - प्रथमेश पार्क सोसायटी - साई मंदिर मार्गे प्रवास करावा. मोशी चौकाकडील वाहनांनी भारतमाता चौक मार्गे जावे.

६. वाकड वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: काळाखडक चौक तसेच जगवार शोरूम व बालवडकर पेट्रोल पम्पाकडून फिनिक्स मॉलकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी.

पर्यायी मार्ग: काळाखडक चौकाकडून पुढे भूमकर चौक मार्गे जावे. तसेच सर्व्हिस रोडने सयाजी अंडरपास किंवा मॉलच्या पाठीमागील रस्त्याचा वापर करावा.

७. देहूरोड वाहतूक विभाग:

प्रवेश बंदी: परंडवाल चौक, साईराज चौक, भैरवनाथ चौक व काळोखे पाटील चौकातून १४ टाळकरी कमान आणि मुख्य कमान महाद्वाराकडे जाण्यास बंदी असेल.

पर्यायी मार्ग: वाहने काळोखे पाटील चौक, साईराज चौक व भैरवनाथ चौक या अंतर्गत जोड रस्त्यांचा वापर करून इच्छित स्थळी जाऊ शकतील.

नागरिकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी माहिती फलक व बॅरिकेट्स लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Labels: Pimpri Chinchwad News, Traffic Divert Pune, Dahi Handi 2026, PCMC Traffic Police, Vikrant Deshmukh, Pune Traffic Update, Civics News

Search Description:Major traffic changes in Pimpri Chinchwad city for Dahi Handi festival on September 5. Check closed roads and alternative routes in Dighi, Sangvi, Pimpri, Bhosari, Wakad areas.

Hashtags: #PimpriChinchwad #PCMCTraffic #DahiHandi2026 #TrafficDiversion #PuneTraffic #PCMCPolice #PublicNotice



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा