विनयभंग व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना सक्त कारावासाची शिक्षा


मुंबई, १० सप्टेंबर २०२६: मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला या दोन स्वतंत्र आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तपासी अधिकारी, कोर्ट अंमलदार व समन्स-वॉरंट पथकाने सादर केलेले सबळ पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा यामुळे आरोपींना दोषी ठरवून सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुर्ला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्र. ५२) यांनी दोन्ही प्रकरणांत आरोपींविरोधात दोषसिद्धीचा निकाल दिला आहे.


पहिल्या घटनेत, १ जून २०१३ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मानखुर्द येथील जयहिंद नगर परिसरात किरकोळ वादातून फिर्यादीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून त्यांचा विनयभंग करण्यात आला होता. तसेच फिर्यादीच्या पतीला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (भा.दं.वि.) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. १ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने आरोपी छोटेलाल कतवारु गुप्ता (वय ४१, रा. जयहिंदनगर, मानखुर्द) याला कलम ३५४ अन्वये २ वर्षे सक्त कारावास व १०,००० रुपये दंड, कलम ४५२ अन्वये २ वर्षे सक्त कारावास व १०,००० रुपये दंड, तसेच कलम ३२३ अन्वये ३ महिने कारावास व १,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसऱ्या घटनेत, १ ऑक्टोबर २०१७ रोजी पहाटे १:४५ वाजता मानखुर्द परिसरात मोटारसायकल पार्किंगच्या वादातून आरोपींनी फिर्यादीवर धारदार शस्त्राने पोटावर आणि कमरेवर वार करून गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणी २ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी शंकर मोतीराम सोनटक्के (वय २६) आणि विशाल प्रभाकर दळवी (वय २६, दोघे रा. मानखुर्द) यांना भा.दं.वि. कलम ३२४ सह ३४ अन्वये ६ महिने सक्त कारावास व १,००० रुपये दंड आणि कलम ३२३ अन्वये १ महिना सक्त कारावास व १,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या दोन्ही खटल्यांच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी आणि कोर्ट कारकुनांनी साक्षीदार व पंचांना योग्य प्रकारे ब्रीफिंग केले. वेळेत मुद्देमाल आणि न्यायवैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केले. समन्स व वॉरंट पथकाने साक्षीदारांना वेळेत न्यायालयात उपस्थित ठेवल्यामुळे तसेच सरकारी अभियोक्ता आणि पोलीस यांच्यातील अचूक समन्वयामुळे आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात यश आले.

सदर  कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) धनंजय कुलकर्णी, पूर्व परिमंडळ-१ चे उपआयुक्त समीर शेख आणि सहायक आयुक्त प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बिलाल शेख, निरीक्षक हणमंत ओऊळकर, सहायक निरीक्षक सुरेश वसेकर, उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार मेटकरी, सरगर, सुनील पाटील, शिपाई कणसे, रूपाली पाटील, महेश मढवी व चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडली.


  • Labels: Mankhurd Police, Mumbai Crime, Conviction News, Court Verdict, Fast Track Justice, Mumbai Police, Sexual Harassment Conviction

  • Search Description: Mankhurd Police secured convictions in two separate serious cases of sexual harassment and deadly assault through strong evidence and effective prosecution in Kurla Court.

  • Hashtags: #MankhurdPolice #MumbaiPolice #JusticeServed #CourtVerdict #LawAndOrder #MumbaiNews

विनयभंग व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना सक्त कारावासाची शिक्षा विनयभंग व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना सक्त कारावासाची शिक्षा Reviewed by ANN news network on ९/१०/२०२६ ०६:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".