शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ‘कलाकार कट्ट्या’वर विविध कलांचा आविष्कार; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' नाटिकेतील बाल कलावंतांचा विशेष सन्मान

 

पिंपरी, ३० ऑगस्ट: अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’ नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात पारंपारिक नृत्य, कथक, स्वरचित कविता, कराओके गाणी, स्वगत, क्लारनेट वादन, भजन आणि चित्र प्रदर्शन अशा विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित 'इतिहास महाराष्ट्राचा २०२६' या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावरील राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट समूह नाटिका ठरलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या या बाल कलावंतांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सुभाष चव्हाण यांच्या शंखनादाने झाली. त्यानंतर कलाक्षेत्रम ग्रुपच्या अनाया, अधिरा, आराध्या आणि अनाया यांनी बहारदार नृत्य सादर केले. नृत्यांगना ऋतुजा देहूगावकर हिच्या कथक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. याशिवाय, नेहा कुलकर्णी यांनी स्वरचित कविता सादर केली, तर वंदना मातेरे आणि सुनीता साळुंके यांनी कराओके गायनाने रंगत आणली.

बालकलाकार ईश्वर साठे याने क्लारनेट वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली, तर कु. वैष्णवी कांबळे हिने प्रभावी स्वगत सादर केले. कार्यक्रमात आरती कोरडे आणि छाया गायकवाड या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोप श्रीराम भजनी मंडळाच्या भजनाने झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी केले. या कलाकार कट्ट्याचे संयोजन संतोष रासने, हरीश मोरे आणि अशोक होनराव यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर आसाराम कसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  • Labels: Cultural News, Pimpri Chinchwad News, Natya Parishad, Kalakar Katta, Ahilyadevi Holkar

  • Search Description: Akhil Bharatiya Natya Parishad's 'Kalakar Katta' was held in Pimpri Chinchwad with enthusiasm; Special felicitation for child artists in the play 'Punyashlok Ahilya Devi'.

  • Hashtags: #PCMC #KalakarKatta #NatyaParishad #CulturalNews #AhilyadeviHolkar #BalRangbhumi

  • कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा