मुंबई, ४ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव बंद पाडून हिंदूंची एकजुटता तोडण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत करत आहेत. होळी किंवा हिंदू सणांच्या वेळी पर्यावरणाचे धडे देणारे राऊत इतर धर्मांच्या सणांमधील प्रथांवर किंवा डीजे आणि रॅलींवर चकार शब्दही काढत नाहीत, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. "संजय राऊत, गणेशोत्सवाच्या नादाला लागाल तर तुमचा पक्ष संपला तसेच तुमचे उरलेसुरले अस्तित्वही संपल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पत्रकार परिषदेतील नवनाथ बन यांच्या टीकेचे प्रमुख मुद्दे:
सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट मारहाण प्रकरण: विद्यानंद बापट यांच्यावरील मारहाणीच्या प्रयत्नाचे कुणीही समर्थन करत नाही, वैचारिक लढाई विचारानेच लढली पाहिजे. मात्र, इतर सणांमध्ये होणारे ध्वनी व पर्यावरणाचे उल्लंघन किंवा लालबागमध्ये गणपती आगमनावेळी घडलेल्या दुष्कृत्यावर संजय राऊत यांनी तोंड का शिवले होते? त्यांनी यावर बोलण्याची हिंमत दाखवावी.
अर्थव्यवस्थेवरील विधानांचा समाचार: "आम्हाला अर्थशास्त्र कळत नाही" असे जाहीरपणे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे राऊत चेले आहेत. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेवरून टीका करणाऱ्या राऊतांनी अर्थशास्त्र आणि जीडीपीवर गप्पा मारू नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मधील १३ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज चौथ्या स्थानावर आली असून लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.
८० कोटी जनतेचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान: केंद्राकडून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याबाबत वक्तव्य करून राऊत देशातील ८० कोटी जनता आणि लाडक्या बहिणींचा अपमान करत आहेत. याच जनतेने आणि लाडक्या बहिणींनी मागच्या निवडणुकीत त्यांना घरी बसवले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवर दावा: "मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची तयारी करत आहेत. स्वपक्षात प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कापणाऱ्या राऊतांचा पत्ता आता आदित्य ठाकरे स्वतः कट करणार आहेत, आणि हे कळण्याइतकीही राऊतांची गुप्तचर यंत्रणा सक्षम नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.
Labels: Maharashtra Politics, BJP Maharashtra, Sanjay Raut, Navnath Ban, Shiv Sena UBT, Ganeshotsav Politics, Mumbai News, Political News
Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban's counterattack on Sanjay Raut's statements. A warning that the sound of Ganeshotsav will cease to exist; Strong criticism of the Thackeray group.
Hashtags: #MaharashtraPolitics #BJP #SanjayRaut #NavnathBan #ShivSenaUBT #Ganeshotsav Politics #MumbaiNews #PoliticalDebate
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा