चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेतील समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु; टेंडरप्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे महापालिकेचे आश्वासन
चऱ्होली: चऱ्होली परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकल्पातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नुकतीच महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना विभागाचे प्रमुख बन्सल यांच्यासोबत एक सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेची टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या प्रकल्पातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाणी गळती आणि अमेनिटी स्पेस व मूलभूत सुविधांची कमतरता यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रत्यक्ष कारवाई घडवून आणण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला.
झालेल्या बैठकीत महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत चर्चा करण्यात आली. यावर बोलताना आवास योजना प्रमुख बन्सल यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून रखडलेली सर्व विकासकामे मार्गी लावली जातील.
दरम्यान, या गृहप्रकल्पातील अत्यंत बिकट बनलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत परिसरात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा दाब, त्याचा कालावधी आणि उपलब्ध होणारे पाणी यांचे प्रत्यक्ष आकलन करण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस दररोज वॉटर रीडिंग घेण्यात येणार आहे. या पाहणीदरम्यान पाण्याचा दाब किंवा पाणीपुरवठा कमी असल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित ठिकाणी तातडीने नवीन पाणीपुरवठा लाईन टाकून नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता भोसले यांनी दिले आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी संबंधित महापालिका विभागांशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांच्या न्याय्य मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कामांना गती देऊन समस्या प्रत्यक्षात सुटाव्यात, अशी तीव्र अपेक्षा आता रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
"चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या गृहप्रकल्पातील अनेक सदनिकांमध्ये गळतीची समस्या असून, बांधकामाच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच नागरिकांना आश्वासन देण्यात आलेल्या अमेनिटी व इतर आवश्यक सोयी-सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
विशेष म्हणजे, या गृहप्रकल्पातील रहिवाशांना पाण्यासारखी मूलभूत सुविधा देण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. महापालिकेने या गृहप्रकल्पातील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रहिवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रशासनाकडून या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही आणि कामे पूर्ण करण्यात आली नाहीत, तर पंतप्रधान आवास योजनेतील सर्व सभासदांना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल."
— संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन
Labels: Pimpri Chinchwad, Pradhan Mantri Awas Yojana, Charholi, PCMC, Water Supply Issue, Sanjivan Sangale
Search Description: Charholi Pradhan Mantri Awas Yojana residents face water scarcity and infrastructure issues. PCMC assures quick tender completion and water pipeline inspection.
Hashtags: #PimpriChinchwad #PCMC #Charholi #PMAY #WaterCrisis #SanjivanSangale #LocalNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: