पुणे: पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हद्दपार आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतून जेरबंद केले. इस्माईल ईब्राहिम शेख (वय २२, रा. जुनी वडारवाडी, बसवेश्वर मठाजवळ, चतुःश्रृंगी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन मिरवणुकीत नाचणाऱ्या या हद्दपार आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फरार व हद्दपार आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक धिरज राऊत आणि अंमलदार आपल्या हद्दीत गस्त घालत शोध घेत होते. यादरम्यान अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक खात्रीशीर माहिती मिळाली. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हद्दपार व गंभीर गुन्ह्यात हव्या असलेला आरोपी इस्माईल ईब्राहिम शेख हा बसवेश्वर मठ परिसरात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये नाचत असल्याची माहिती बातमीदाराने दिली.
बातमीची शहानिशा केल्यानंतर ही माहिती तात्काळ गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक दिपक लगड यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक धिरज राऊत व अंमलदारांच्या पथकाने बसवेश्वर मठ परिसरात जाऊन पाहणी केली असता, नमूद इसम त्या ठिकाणी मिळून आला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव इस्माईल ईब्राहिम शेख असे सांगितले.
तपासात हा आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असून पोलीस त्याच्या शोधात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त (गुन्हे १) शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिपक लगड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक धिरज राऊत, अंमलदार बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नांगरे आणि संतोष अनुसे यांच्या पथकाने केली आहे.
Labels: Pune Police, Crime Branch, Chatanushringi, Arrest News, Pune Crime, Ganpati Mirvanook
Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrested absconding criminal Ismail Ibrahim Shaikh while he was dancing in Ganpati procession in Chaturshringi area.
Hashtags: #PunePolice #CrimeBranch #PuneCrime #BreakingNews #Arrested #Chaturshringi #Pune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: