मुंबई: दिशा सालियन प्रकरणात न्यायालयाच्या थेट आदेशानंतर गुन्हा दाखल झाला असताना यामध्ये कोणतेही राजकीय षडयंत्र नसून, या कारवाईमुळे ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे अडचणीत आल्याचा सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आदित्य ठाकरे राजकीय पटलावरून नाहीसे झाल्यानंतर ठाकरे गट पूर्णपणे आपल्या ताब्यात येईल आणि आपण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसू, अशी संजय राऊत यांची सुप्त इच्छा असल्याचा घणाघाती दावा त्यांनी केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिशा सालियन प्रकरणावर भाजपचा थेट सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी दिशा सालियन प्रकरणातील राजकीय आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील स्वतः न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरच आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मग यामध्ये राजकीय षडयंत्र कुठे आले? एकीकडे संजय राऊत सांगतात की महायुतीचे सरकार असताना पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करतात. जर सरकारचे षडयंत्र असते, तर पोलिसांनी पूर्वी क्लोजर रिपोर्ट दिलाच नसता."
ते पुढे म्हणाले, "दिशा सालियन प्रकरणात जर कोणी दोषी नसेल, तर तपास यंत्रणांना घाबरण्याचे कारण काय? निष्पक्ष चौकशीतून दूध का दूध आणि पानी का पानी सिद्ध होईल. मुळात ठाकरे कुटुंबाच्या स्थानाला बाहेरचा कोणीही डाग लावण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ठाकरे कुटुंबाचे राजकारणातील स्थान डळमळीत करण्याचे काम संजय राऊत हेच करत आहेत. काँग्रेससोबत जाऊन तुम्ही ठाकरे कुटुंबाच्या वैचारिक वारशाला आधीच डाग लावला आहे. तत्कालीन सरकार आणि आदित्य ठाकरे दोषी नसतील तर सत्याला सामोरे जा."
डीलिमिटेशन आणि खासदार संख्येवरून संजय राऊतांना टोला
मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयकावरून संजय राऊत यांनी केलेल्या विधानांवर उत्तर देताना नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या खासदार संख्येवरून जोरदार टोलेबाजी केली.
"डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाचे किती खासदार वाढणार आहेत? तुमच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार आधीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. उरलेले तीन खासदार एका रिक्षातून फिरू शकतात, त्यापलीकडे तुमची राजकीय क्षमता उरलेली नाही. त्यामुळे अशा तीन खासदारांच्या जोरावर डीलिमिटेशन विधेयक मंजूर होणार की नाही, अशा भविष्यवाणी करण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. 'इन मीन तीन' अशी तुमची अवस्था असल्याने तुमचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय, त्याने देशाच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. हे विधेयक मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पूर्णपणे सक्षम आहेत," असे नवनाथ बन म्हणाले.
राज ठाकरेंच्या ट्विटचा रोख अमित ठाकरेंकडेच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत नवनाथ बन यांनी मनसे आणि अमित ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असे राज ठाकरे यांनी केलेले ट्विट हे वस्तुतः अमित ठाकरे यांच्यासाठीच आहे, असा दावा त्यांनी केला.
नवनाथ बन म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील फोटो हटवून त्यांची देशातील प्रतिमा आणि लोकप्रियता कधीही कमी होऊ शकत नाही. देशातील १४० कोटी जनता भक्कमपणे पंतप्रधानांच्या पाठीशी उभी आहे. हाच सल्ला राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना आधी घरी दिला होता आणि आता ट्विटच्या माध्यमातून सार्वजनिकपणे दिला आहे. यापूर्वी पुण्यात फोटो काढला होता, त्या वेळीही राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना पत्रकार परिषद घेऊ दिली नव्हती किंवा माध्यमांसमोर भूमिका मांडू दिली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नादी लागू नका; कावळ्याने कितीही शाप दिले तरी पंतप्रधानांना मिळालेला जनतेचा पाठिंबा कमी होणार नाही, हे शेवटी राज ठाकरे आणि मनसेने मान्य केले आहे."
या संपूर्ण घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाजप, ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील कलगीतुरंग अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Labels: Navnath Ban, BJP Maharashtra, Sanjay Raut, Aditya Thackeray, Disha Salian Case, Raj Thackeray, Amit Thackeray, Maharashtra Politics
Search Description: BJP spokesperson Navnath Ban attacks Sanjay Raut over Aditya Thackeray and Disha Salian case, claiming Raut is happy about Thackeray's legal troubles.
Hashtags: #NavnathBan #BJP #SanjayRaut #AdityaThackeray #DishaSalianCase #MaharashtraPolitics #RajThackeray
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: