छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुद्धीकरण मोहिमेस ३५० वर्षे पूर्ण: सोलापुरात 'राष्ट्रीय शुद्धीकरण दिन' साजरा, ५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजासमोर पराक्रम आणि धर्मरक्षणाचा एक नवा आदर्श उभा केला होता. या ऐतिहासिक घटनेला तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सोलापुरातील अशोक चौक येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदु धर्म सोडून अन्य धर्मात गेलेल्या ५ जणांनी स्वेच्छेने व विधीवत हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. तसेच या दिवसाला ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने समस्त हिंदू समाजाला केले.
‘गजवा-ए-हिंद’ ऐवजी ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्याचे आवाहन
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, फसवणूक, प्रलोभने आणि 'लव्ह जिहाद'सारख्या मार्गांनी होणाऱ्या धर्मांतरांना रोखण्यासाठी हिंदू समाजाने आता संघटित झाले पाहिजे. आपण केवळ इतिहास वाचणारे नव्हे, तर इतिहास घडवणारे मावळे झाले पाहिजे. ‘गजवा-ए-हिंद’च्या संकल्पनेला प्रखर विरोध करत ‘भगवा-ए-हिंद’ साकार करण्याचा संकल्प प्रत्येक हिंदूने केला पाहिजे, असे प्रखर आवाहन त्यांनी या वेळी केले.
त्यांनी पुढे नमूद केले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी अमानुष छळ सोसून बलिदान दिले, परंतु परधर्म स्वीकारला नाही. तोच बाणा प्रत्येक हिंदूने अंगीकारला पाहिजे. तसेच, धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात सन्मानाने घेण्यासाठी समाजाने आपली दारे सदैव खुली ठेवली पाहिजेत.
प्रबोधनाला समाजातून सकारात्मक प्रतिसाद
हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे यांनी आपले अनुभव मांडताना सांगितले की, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी चालवलेल्या प्रबोधन मोहिमेला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजही अनेक धर्मांतरित व्यक्तींना स्वधर्मात परतण्याची तीव्र इच्छा असून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सन्मानाने परत आणण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे यांनी वाढत्या धर्मांतराच्या समस्येवर प्रकाश टाकला. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धर्मांतरामुळे अनेक भागांतील हिंदू बहुसंख्यांक समाज दुर्दैवाने अल्पसंख्यांक होत चालला आहे. हा केवळ धार्मिक मुद्दा नसून राष्ट्र आणि धर्माच्या अस्तित्वावर झालेला गंभीर आघात आहे. या आव्हानाला रोखण्यासाठी हिंदू समाजाने अधिक सजग आणि सक्रिय होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धार्मिक श्रेष्ठत्व आणि मुक्तीची संकल्पना
श्रीक्षेत्र तुळजापूरचे महंत मावजीनाथ महाराज यांनी भगवद्गीतेतील वचनांचा संदर्भ देत सांगितले की, स्वतःच्या धर्मात मृत्यू आला तरी तो कल्याणकारी असतो, परंतु परधर्मात जाणे जीवनासाठी घातक ठरते. हिंदु धर्मात मुक्ती आणि मोक्षाची संकल्पना आहे. त्यामुळे हिंदूंनी आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व ओळखून धर्मांतरित होणाऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे.
या प्रसंगी प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने धर्मरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. परधर्मात गेलेला प्रत्येक हिंदू स्वधर्मात सन्मानाने परत येईपर्यंत जागृती, संघटन आणि शुद्धीकरणाचे कार्य वेगाने पुढे नेण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
Labels: Rashtriya Shuddhikaran Din, Solapur News, Hindu Janajagruti Samiti, Netaji Palkar Shuddhikaran, Sunil Ghanawat, Solapur Event
Search Description: National Shuddhikaran Din observed in Solapur on the 350th anniversary of Netaji Palkar's homecoming. 5 individuals re-entered Hinduism in a ceremony organized by Hindu Janajagruti Samiti and Hindurastra Sena.
Hash Tags
#SolapurNews #RashtriyaShuddhikaranDin #NetajiPalkar #HinduJanajagrutiSamiti #GharWapasi #MaharashtraNews #ShivajiMaharaj
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: