पुणे (लोणीकंद): पुणे शहराच्या हद्दीतील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या हवेली तालुक्यातील आष्टापूर येथे शेतामध्ये उभा असलेला तब्बल ४० टन ऊस चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेतकरी कुटुंब आजारी आईच्या उपचारासाठी शहरात गेले असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी अवघ्या चार दिवसांत संपूर्ण शेतातील उसाची तोडणी करून परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अत्यंत तप्तरतेने तपास करत ऊस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे.
नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय २९ वर्षे, रा. मु.पो. आष्टापूर, पठारवाडी, ता. हवेली, जि. पुणे) आणि योगेश पोपट गव्हाणे (वय २५ वर्षे, रा. रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या मागे, आष्टापूर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
आई आजारी असल्याने कुटुंब मुंढव्यात; शेतात मारला डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आष्टापूर येथील गट नंबर ८२२ मध्ये तक्रारदार शेतकरी व त्यांच्या भावांची संयुक्त मालकीची शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये त्यांनी गेल्या सात महिन्यांपासून अत्यंत मेहनतीने उसाचे पीक घेतले होते. दरम्यान, १९ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार यांच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळे संपूर्ण कुटुंब आईला उपचारासाठी व काळजी घेण्यासाठी मुंढवा येथील राहत्या घरी घेऊन गेले होते. तक्रारदार हे १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंढव्यातच थांबले होते.
शेतात कोणीही नसल्याची आणि घर बंद असल्याची संधी साधून स्थानिक परिसरातील आरोपींनी शेतात डल्ला मारण्याची योजना आखली. आरोपी नवनाथ कोतवाल याच्या सांगण्यावरून आरोपी योगेश गव्हाणे याने काही मजूर व कामगारांना सोबत घेऊन रात्रीच्या व दिवसाच्या वेळी संधी साधून शेतातून परस्पर ऊस तोडणी सुरू केली.
८८ हजार रुपयांचा ४० टन ऊस लंपास
तक्रारदार शेतकरी जेव्हा २४ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या आष्टापूर येथील शेतात परत आले, तेव्हा त्यांना शेतातील सात महिन्यांचे उसाचे पीक पूर्णपणे गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी शेतातील सुमारे ८८,००० रुपये किमतीचा तब्बल ४० टन ऊस तोडून वाहनांमध्ये भरून चोरी करून नेला होता.
आपल्या कष्टाचे पीक चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने तात्काळ लोणीकंद पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून २४ ऑगस्ट २०२६ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची चक्रे फिरली अन् आरोपी जाळ्यात
गुन्हा दाखल होताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा ऊस आष्टापूर येथील नवनाथ कोतवाल याच्या चिथावणीवरून योगेश गव्हाणे याने आपल्या कामगारांच्या मदतीने तोडून नेल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, चोरी केलेला ऊस त्यांनी कुठे विक्री केला आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस अंमलदार सागर जगताप करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ७ चे उपआयुक्त अबिनाष कुमार आणि लोणीकंद विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे, सहाय्यक निरीक्षक गजानन कागणे, अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, मल्हारी सुपरे, सुधीर शिवले, दिनेश मरकड, सागर वाळके, अजिंक्य ढमढेरे, सचिन चव्हाण आणि सुनिल काळे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
Labels: Pune Crime, Lonikand Police Station, Sugarcane Theft, Ashtapur Haveli, Pune Police Action, BNS Section 303, Maharashtra Crime News
Search Description: Lonikand Police arrested two individuals for stealing 40 tons of sugarcane worth Rs 88,000 from a farm in Ashtapur, Haveli, Pune.
Hashtags: #PuneCrime #LonikandPolice #SugarcaneTheft #Ashtapur #PuneNews #MaharashtraPolice #CrimeNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा