मुंबई, १० ऑगस्ट २०२६: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर केलेल्या टीकेला भाजपकडून अत्यंत आक्रमक शब्दांत उत्तर देण्यात आले आहे. "संजय राऊत हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' मालिकेचा पुढचा भाग सादर करून पुन्हा सत्तेत येण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना भाजप आमदार फोडण्याचे आणि त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु भाजपचा एक साधा नगरसेवक किंवा कार्यकर्ताही त्यांना फोडता आला नाही. सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था एका बचत गटासारखी झाली असून त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा येत्या काळात हा बचत गटही उरणार नाही आणि टमटममध्ये बसलेल्या चार प्रवाशांसारखी त्यांची अवस्था होईल," अशा अत्यंत तिखट शब्दांत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह?
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या स्वाभिमानाच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. "आम्ही स्वाभिमानी आहोत, त्यामुळे आमचा पक्ष फोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार नाही," असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर बोलताना बन म्हणाले, "संजय राऊत यांच्या या विधानाचा अर्थ असा होतो का की शरद पवार स्वाभिमानी नाहीत? सुप्रिया सुळे स्वाभिमानी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या आठ खासदारांच्या स्वाभिमानावर संजय राऊत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत का?"
पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी आपला स्वाभिमान काँग्रेसच्या चरणी अर्पण केला असून ते राहुल गांधी यांची जीहुझुरी करत आहेत. त्यांच्या हातातील खंजिराला गद्दारीचे रक्त लागलेले असल्याने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे धनुष्यबाण पेलू शकले नाहीत. म्हणूनच जनतेने आणि निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा कौल दिला.
अलिबागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचे खुले आव्हान
संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले, "संजय राऊत यांनी विनाकारण बढाया मारू नयेत. महाराष्ट्रातील जनतेने अपयशी आणि षंढ असा शिक्का त्यांच्यावर मारलेला आहे. संजय राऊत यांना जर स्वतःच्या लोकप्रियतेची आणि मर्दानगीची चाचणी देण्याची एवढीच खुमखुमी असेल, तर माझे त्यांना खुले आव्हान आहे की त्यांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत अलिबागच्या कोणत्याही गावातून निवडणूक लढवून दाखवावी. भाजपचा एक साधा कार्यकर्ताही संजय राऊत यांचा पराभव करेल. ग्रामपंचायत, महापालिका किंवा विधानसभा निवडणुकीत उतरून त्यांनी आपले जनाधार सिद्ध करावे, म्हणजे कोण काय आहे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध होईल."
'६ खासदार नाकाखालून गेले तरी थांगपत्ता लागला नाही'
महाविकास आघाडीच्या भवितव्यावर आणि पूर्वी केलेल्या दाव्यांवर बोट ठेवताना भाजप प्रवक्त्याने सांगितले की, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार २५ वर्षे राहील असा दावा केला होता, जो पूर्णपणे खोटा ठरला. 'आमचा एकही खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार नाही' असा दावाही त्यांनी केला होता, मात्र त्यांच्या पक्षाचे सहा खासदार नाकाखालून निघून गेले तरी त्यांना थांगपत्ता लागला नाही. आता ते शरद पवार यांच्या पक्षाबाबत भाकीत करत आहेत, परंतु भविष्यात काय होते हे सर्वांनाच दिसेल.
पंतप्रधानांच्या भेटीवर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत सोडून इतर सर्व पक्षांचे नेते आणि खासदार आपापल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मते मागून नंतर काँग्रेससोबत जाऊन संजय राऊत यांनी जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे पंतप्रधान मोदींसमोर तोंड वर करून उभे राहण्याची त्यांची लायकी उरलेली नाही, म्हणूनच ते भेटीला जाणे टाळतात आणि लाजीरवाणी विधाने करतात.
Labels:
BJP Maharashtra, Sanjay Raut, Navnath Ban, Shiv Sena UBT, Sharad Pawar, Narendra Modi, Maharashtra Politics
Search Description:
BJP State Chief Spokesperson Navnath Ban slammed Shiv Sena UBT MP Sanjay Raut over his statements against PM Narendra Modi and Amit Shah.
Hashtags:
#BJP #SanjayRaut #NavnathBan #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #NarendraModi #MumbaiNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: