'संजय राऊतांनी आधी साडेनऊ हजार कोटींचा हिशेब द्यावा!'; भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई (१२ ऑगस्ट २०२६): महाराष्ट्रातील गडचिरोली येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील दुर्घटनेवरून आणि सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीवरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचा भारतीय जनता पक्षाने अत्यंत कडक आणि सडेतोड शब्दांत समाचार घेतला आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचा झपाट्याने विकास होत असून तेथे भव्य स्टील हब निर्माण करण्याचे काम सुरु आहे. स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते आणि सुसज्ज इमारती उभ्या राहत आहेत. राज्य सरकारने तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, पैसे कसे खायचे, हे जनाब संजय राऊत यांनाच सर्वात जास्त माहिती आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये या हिशेबाने कमावलेल्या साडेनऊ हजार कोटींचा हिशेब आधी संजय राऊत यांनी द्यावा. पत्राचाळीत आणि खिचडी घोटाळ्यात कामगारांचे शोषण करून त्यांचे पैसे खाणाऱ्या संजय राऊत यांनी भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही," असा तीव्र प्रहार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊत, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
गडचिरोलीतील दुर्घटनाग्रस्त आश्रमशाळा काँग्रेस नेत्याचीच
गडचिरोलीतील आश्रमशाळेत घडलेल्या तीन विद्यार्थिनींच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणावर बोलताना नवनाथ बन यांनी विरोधकांचा बुरखा फाडला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर आदेश देत गडचिरोलीतील त्या संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द केली आहे. तसेच दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. स्वतः आदिवासी विकासमंत्री तेथे जाऊन पुढील कारवाईचे आदेश देणार आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "ही संबंधित आश्रमशाळा चालवणारे मारुतराव कोवासे हे काँग्रेसचे तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले प्रमुख नेते होते. सरकार या शाळांना केवळ अनुदान देते, परंतु ते अनुदान योग्य प्रकारे खर्च करण्याची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित संस्थाचालकांची असते. त्यात काही गैरप्रकार किंवा निष्काळजीपणा आढळल्यास सरकार कठोर कारवाई करते. संजय राऊत, या दुर्घटनेत ३ निष्पाप विद्यार्थिनींचा जीव गेला आहे. मग या प्रकरणात तुम्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारणार आहात का?" असा थेट सवाल बन यांनी उपस्थित केला.
'निकाल विरोधात गेला की दूषणे देणे ही राऊतांची डबल ढोलकी'
सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा नवनाथ बन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. "शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायालयात कधीच लागलेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा स्पष्ट कौल जनतेने दिलेला आहे. निवडणूक आयोगाने तुमच्याविरोधात निकाल दिला की निवडणूक आयोग 'दलाल' होतो आणि न्यायालयाने एखादा निर्णय विरोधात दिला की न्यायालयाला दूषणे दिली जातात," अशी टीका त्यांनी केली.
"आज सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक करतात आणि उद्या निकाल विरोधात आला की लगेच खडे फोडायला सुरुवात करतात. ही संजय राऊत यांची दुटप्पी आणि 'डबल ढोलकी'ची भूमिका आहे. एकदा न्यायालयाने आणि घटनापीठाने निर्णय दिल्यानंतर त्याच्याविरोधात बोलणे आणि न्यायाव्यवस्थेवर शंका उपस्थित करणे हे अत्यंत चुकीचे आहे," अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना फैलावर घेतले.
'अमित शाह संसदेत आले अन् राहुल गांधी पळून गेले'
संसदेतील कामकाज आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावरून बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "काल संसदेमध्ये नेमके कोण घाबरले, हे संपूर्ण देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत चर्चेसाठी आले आणि राहुल गांधी यांनी संसदेपासून पळ काढला. राहुल गांधी केवळ संसदेतूनच नव्हे, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतूनही पळून गेले होते. १५ दिवसांपूर्वीही ते कुठेतरी परदेशात कुणासोबत तरी पळून गेल्याचे या संपूर्ण देशाने पाहिले आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "पळपुटा कोण आहे आणि प्रश्नांना निडरपणे सामोरे जाणारे कोण आहेत, हे देशातील जनतेला पुरेशी माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे नेतृत्व देशाने मनापासून स्वीकारले आहे. संसदेमध्ये प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याची अमित शाह यांची पूर्ण तयारी आहे, परंतु राहुल गांधी यांची उत्तरे ऐकायचीच तयारी नाही. संजय राऊत, विनाकारण अमित शाह यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा आधी राहुल गांधी यांना लोकसभेत पूर्ण वेळ बसायला सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन तुमचे तोंड बंद करण्यासाठी अमित शाह पूर्णपणे सक्षम आहेत," असा टोला नवनाथ बन यांनी शेवटी लगावला.
Labels:
BJP Maharashtra, Navnath Ban, Sanjay Raut, Devendra Fadnavis, Gadchiroli Ashram School, Rahul Gandhi, Amit Shah
Search Description:
BJP State Chief Spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut over Gadchiroli ashram school issue, MVA corruption, and Parliament debate.
Hashtags:
#NavnathBan #BJP #SanjayRaut #DevendraFadnavis #Gadchiroli #RahulGandhi #AmitShah #MaharashtraPolitics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: