चहाच्या दुकानाच्या आडून बेकायदेशीर गुटखा विक्री; चंदननगर पोलिसांची धडक कारवाई, १ जण ताब्यात




पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ ७ च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १:०० वाजता विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वडगावशेरी येथील एका घरावर धाड टाकून १,७३,७४८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला.

झोन ७ च्या विशेष पथकाला मोझेसवाडी, वेतन सुपर मार्केटच्या शेजारी राहणारा आणि चहा विक्रीचा व्यवसाय करणारा यल्लपा त्रिकप्पा शेट्टी (वय ३५, रा. पाटोळे चाळ, सचिननगर, वडगावशेरी) हा राहत्या घरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ताब्यात घेतला.

मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू 
प्राथमिक चौकशीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या यल्लपा शेट्टी याला हा प्रतिबंधित माल चंद्रकांत फुलचंद पटवा (रा. वडगावशेरी) याच्याकडून पुरवला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चंद्रकांत पटवाला या प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी केले असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, पुढील तपासासाठी जप्त मुद्देमाल व आरोपीला चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशेष पथकाची कौतुकास्पद कामगिरी 
ही कारवाई सहाय्यक  निरीक्षक गोरक्षनाथ खरड, उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे आणि शिपाई हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे व लालु कन्हे यांनी केली.

नागरिकांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत अमली पदार्थ, बेकायदेशीर दारू, जुगार व अवैध गुटखा विक्रीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा उपआयुक्त अबिनाश कुमार यांनी दिला आहे. तसेच हद्दीत अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास नागरिकांनी ८८०२००७९३८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


  • Labels: Pune Police, Mission Crackdown, Gutkha Seizure, Chandan Nagar Police, Crime News Pune, Illegal Tobacco Ban

  • Search Description: Pune Police Zone 7 special team seized illegal gutkha worth over Rs 1.73 lakh in Vadgaon Sheri under Mission Crackdown. One suspect arrested.

  • Hashtags: #PunePolice #MissionCrackdown #PuneNews #CrimeNews #ChandanNagar #GutkhaBan


चहाच्या दुकानाच्या आडून बेकायदेशीर गुटखा विक्री; चंदननगर पोलिसांची धडक कारवाई, १ जण ताब्यात चहाच्या दुकानाच्या आडून बेकायदेशीर गुटखा विक्री; चंदननगर पोलिसांची धडक कारवाई, १ जण ताब्यात Reviewed by ANN news network on ८/२६/२०२६ ०८:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".