पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा; खासदार श्रीरंग बारणे यांचे रेल्वे प्रशासनाला कडक निर्देश
चिंचवड स्थानकावर प्रगती, महालक्ष्मी अन् चेन्नई एक्स्प्रेसला थांबा द्या!
पिंपरी, पुणे: पुणे ते लोणावळा दरम्यान वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता प्रलंबित असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती देऊन हे काम नेमके कधी पूर्ण होणार, याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करा, असे थेट निर्देश मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यात यावेत तसेच पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त आरक्षित डब्यांची (Coaches) व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची महत्त्वपूर्ण संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, प्रवासी सुरक्षा, रेल्वे उड्डाणपूल, सबवे आणि रखडलेल्या विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमृत भारत स्थानकांच्या कामांत सुधारणांचे आदेश
केंद्र सरकारच्या 'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत पिंपरी-चिंचवड व मावळ मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा या स्थानकांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. या स्थानकांवरील विकासकामांमध्ये आवश्यक असणाऱ्या तांत्रिक व पायाभूत सुधारणा करून ती कामे विहित मुदतीत व तात्काळ पूर्ण करावीत, अशी स्पष्ट सूचना खासदार बारणे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
या उच्चस्तरीय बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग सोनवणे, खासदार विशाल पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार भास्कर भगरे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार ज्योती वाघमारे, खासदार बालाजी काळगे, खासदार धैर्यशील माने, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कृष्ण किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता यांच्यासह दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे सबवे, अंडरपास अन् खड्ड्यांच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधताना खासदार बारणे म्हणाले की, कामशेत येथील एलजी गेट क्रमांक ४२ जवळील सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तेथे रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारण्यात यावा किंवा योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा.
याशिवाय, मळवली एलजी गेट क्रमांक ३२ येथील प्रलंबित उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याच्या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. केशवनगर–वडगाव गेट क्रमांक ४९ जवळील बंद असलेला अंडरपास तातडीने सुरू करावा, तसेच जांभुळवाडी येथील अंडरपासजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवून तेथील पाणी साचण्याची समस्या दूर करत काम पूर्ण करावे, असे बारणे यांनी बजावले.
प्रगती, महालक्ष्मी अन् चेन्नई एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांब्याची मागणी
पुण्याकडून मुंबई तसेच दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आधीच प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानकांवर प्रवाशांना चढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात यावेत.
त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रगती एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेस या तीन प्रमुख गाड्यांना चिंचवड रेल्वे स्थानकावर त्वरित थांबा देण्यात यावा. पुणे–लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळात लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते; ही बाब लक्षात घेऊन दुपारी अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात यावी. तसेच कोविड काळात बंद करण्यात आलेले विविध रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी आक्रमक भूमिका बारणे यांनी मांडली.
फुगेवाडीतील रस्ता अन् जुन्या गाड्या पूर्ववत करण्याची सूचना
फुगेवाडी येथे सध्या पुश पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे स्थानिक स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाणारा जुना मार्ग बंद झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (RTO) योग्य समन्वय साधून हा मार्ग लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावा. तसेच काम पूर्ण होईपर्यंत स्थानिक नागरिकांसाठी पायी जाण्याची सुरक्षित वाट खुली ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बंद करण्यात आलेली सह्याद्री एक्स्प्रेस प्रवाशांच्या अतोनात मागणीचा विचार करून पूर्ववत मुंबईपर्यंत चालवण्यात यावी आणि बारामती–कर्जत पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना खासदार बारणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ महाव्यवस्थापकांना केली.
Labels:
Pune Lonavala Railway,Shrirang Barne,Pimpri Chinchwad News,Indian Railways,Murlidhar Mohol,Amrit Bharat Station,Railway Review Meeting,Central RailwaySearch Description:
MP Shrirang Barne demands timeline for Pune Lonavala 3rd and 4th railway line. Demands halts for Pragati, Mahalakshmi, and Chennai Express at Chinchwad.Hashtags:
#PuneLonavalaRailway #ShrirangBarne #IndianRailways #PimpriChinchwad #AmritBharatStation #MurlidharMohol #CentralRailway #RailwayNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: