पिंपरी, पुणे | २९ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरासाठी नवीन "सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण" तयार करण्याची घोषणा केली आहे. या धोरणाची आखणी करताना शहरातील महिलांची गरज आणि सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य, सुरक्षित आणि स्वतंत्र ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, अशी आग्रही मागणी माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजा प्रवीण कुदळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा नागरी विस्तार वेगाने होत असून शहराची लोकसंख्या आज सुमारे ३० लाखांहून अधिक झाली आहे. दररोज कामानिमित्त, बाजारात, महाविद्यालयांमध्ये आणि प्रवासासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, शहरात महिलांसाठी पुरेशा आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून या मूलभूत समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या आगामी स्वच्छतागृह धोरणात महिलांच्या आरोग्याला व सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे कुदळे यांनी आयुक्त डॉ. अजय सूर्यवंशी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कुदळे यांनी आपल्या पत्रात महिला स्वच्छतागृहांच्या दर्जोन्नतीसाठी अनेक महत्त्वाच्या आणि व्यावहारिक उपाययोजना मांडल्या आहेत. शहरात केवळ नावाला स्वच्छतागृह न उभारता त्या ठिकाणी अत्याधुनिक 'इ-टॉयलेट्स' (E-Toilets) उपलब्ध करून दिले जावेत. या स्वच्छतागृहांमध्ये दररोज नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, हात धुण्यासाठी पुरेसे पाणी, लिक्विड सोप आणि पेपर नॅपकिनची व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की, स्वच्छतागृहांच्या परिसरात २४ तास वीज आणि पुरेसा प्रकाश असावा. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक आणि देखभालीसाठी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जावी. याशिवाय, कामानिमित्त किंवा प्रवासात लहान बाळांना सोबत घेऊन जाणाऱ्या मातांसाठी स्वच्छतागृहात 'बेबी चेंजिंग रूम', सॅनिटरी नॅपकिनचे ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशिन आणि वापरलेल्या नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरणपूरक डिस्पोजल मशिन अशा सर्व आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात याव्यात.
यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी विनाअभ्यास, अनावश्यक आणि असुरक्षित भागांमध्ये महिला स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. असुरक्षित वातावरणामुळे किंवा देखभालीअभावी यातील अनेक स्वच्छतागृहांचा महिलांना कोणताही उपयोग होत नसून ती धुळखात पडून आहेत. त्यामुळे प्रशासनाने आधीच्या अशा सर्व स्वच्छतागृहांचा तात्काळ सविस्तर आढावा घ्यावा, तसेच महिलांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारी स्वच्छतागृहे स्थलांतरित करून किंवा त्यांची दुरुस्ती करून ती पूर्ववत वापरायोग्य करावीत, अशी मागणीही कुदळे यांनी शेवटी केली आहे.
Labels: PCMC News, Girijadevi Kudale, Public Toilet Policy, Women Safety, Pimpri Chinchwad, Municipal Commissioner, E Toilets
Search Description: Former Education Board Chairperson Girijadevi Kudale demands inclusion of modern, safe women's e-toilets in PCMC's new public toilet policy.
Hashtags: #PimpriChinchwad #WomenSafety #PCMC #PublicToiletPolicy #GirijadeviKudale #Sanitation #EToilets
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा