घटनेची सविस्तर माहिती अशी की, काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक तांत्रिक विश्लेषणाद्वारे व सीसीटीव्हीच्या माध्यमातून कसून शोध घेत होते. यादरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांच्या एका गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील चोरी झालेली दुचाकी एका तरुणाकडे असून तो हिलग्रीन शाळेपुढे जाणाऱ्या रोडवर उंड्री येथे थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीची खात्री पटताच सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांच्या पथकाने तात्काळ नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि पाहणी करून संबंधित विधीसंघर्षित बालकाला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसी बडगा दाखवून अधिक सखोल चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील विविध भागांतून गाड्या आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये काळेपडळ (कोंढवा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० हजार रुपयांची होंडा ड्रीम युगा दुचाकी, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८० हजार रुपयांची निळ्या रंगाची एक्टिवा दुपेड, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडीच लाख रुपयांची रिक्षा आणि ६० हजार रुपयांची हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अल्पवयीन बालकाकडून जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तेमुळे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील प्रलंबित गुन्हे उघडकीस आले आहेत. या विधीसंघर्षित बालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ चे जीवन बेनीवाल, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.
Labels: Pune Police, Vehicle Theft Busted, Kalepadal Police Station, Juvenile Apprehended, Crime News
Search Description: Kalepadal Police station team apprehended a juvenile in Undri Pune and recovered three two-wheelers, an auto-rickshaw, and a mobile phone worth Rs 4,50,000.
Hashtags: #PunePolice #VehicleTheft #KalepadalPolice #CrimeNews #UndriPune #MaharashtraPolice
तीन दुचाकी, एक रिक्षा आणि मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२६ ०८:२६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: