जळगाव: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याच्या महसूल व नोंदणी विभागात खळबळ उडवून देणारी आतापर्यंतची सर्वात मोठी घरझडतीची कारवाई जळगाव शहरात केली आहे. अकोला येथे कार्यरत असलेले सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानातून तब्बल २ कोटी ९४ लाख ५४ हजार ८४७ रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि बेकायदेशीर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर घेण्यात आलेल्या या झडती सत्राने भ्रष्ट अधिकार्यांच्या वर्तुळात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे मूळ प्रकरण?
आरोपी लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी (वय ५७ वर्ष, व्यवसाय- नोकरी, पद- सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, वर्ग-१, अकोला, रा. फ्लॅट नंबर ५, साईप्रभा आर्केड, विष्णू नगर, खाजामिया रोड, जळगाव) यांना तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २६ जून २०२६ रोजी रंगेहात पकडले होते. याप्रकारणी अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या कारवाईनंतर आरोपी चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानाची झडती घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
बंद फ्लॅटमध्ये घुसण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न आणि नाट्यमय कारवाई
अकोला एसीबीच्या माहितीनुसार २६ जून रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर, जळगाव एसीबीच्या पथकाने २८ जून २०२६ रोजी आरोपीचे जळगाव येथील घर झडतीसाठी गाठले. सुरुवातीला हे घर पंचसमक्ष सिलबंद करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात, २८ जून २०२६ च्या रात्री अंदाजे २.०० वाजताच्या सुमारास आरोपी किरण चौधरी यांचे नातेवाईक सिलबंद घराचे कुलूप तोडून, मागील गॅलरीच्या दरवाजा वाटे आत घुसले. घरात ठेवलेला लाचेचा आणि बेहिशोबी संपत्तीचा पुरावा नष्ट करणे तसेच मुद्देमाल लंपास करणे हा यामागील मुख्य उद्देश होता. मात्र, जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी तातडीने धाव घेत या नातेवाईकांना रंगेहात घरफोडी करताना पकडले. या संदर्भात जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(२), २३८, ६२ प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरझडतीमध्ये मिळालेले कोट्यवधींचे घबाड
त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दोन शासकीय पंच, बँक कॅशियर, गोल्ड व्हॅल्युअर यांच्या उपस्थितीत घराची सविस्तर झडती घेतली. या झडतीमध्ये खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:
१,९५,८४,६३०/- रुपये (एक कोटी पंच्याण्णव लाख चौर्याऐंशी हजार सहाशे तीस रुपये) रोख स्वरूपात घरात लपवून ठेवलेले सापडले.
६०,५७,१३५/- रुपये किमतीचे एकूण ४२२.१०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
३१,४१६/- रुपये किमतीचे एकूण १५५४.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केले.
६२,१३,३७६/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेले रिअल इस्टेट व प्रॉपर्टीचे कागदपत्र सापडले.
११,५२,७४५/- रुपये किमतीच्या सोने खरेदी केल्याच्या कायदेशीर पावत्या मिळाल्या.
६,२५,५४५/- रुपये किमतीच्या घरातील मौल्यवान वस्तूंची नोंद करण्यात आली.
घरातून एकूण २ कोटी ९४ लाख ५४ हजार ८४७ रुपयांचा प्रचंड मोठा ऐवज जप्त करून शासनाधीन करण्यात आला आहे.
तपास पथक आणि वरिष्ठ मार्गदर्शन
सदरची क्लिष्ट आणि मोठी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदिप मैराळे आणि अपर अधीक्षक कविता फडतरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. जळगाव एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा उपअधीक्षक योगेश ठाकूर, झडती अधिकारी तथा निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह मदत पथकातील निरीक्षक रेश्मा अवतारे, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, सचिन चाटे, मनोज पाटील, अमोल सुर्यवंशी, राकेश दुसाने, भुषण पाटील, प्रदिप पोळ आणि प्रणेह ठाकूर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
Labels :
Jalgaon News,ACB Maharashtra,Kiran Choudhari Case,Corruption Raid,Government Officer ArrestedSearch Description: Maharashtra ACB raided the house of Class 1 Officer Kiran Choudhari in Jalgaon, seizing 2.94 Crore worth of cash, gold ornaments, and property documents. Read full details of the bribery and seizure case here.
Hashtags: #JalgaonNews #ACBRaid #AntiCorruption #MaharashtraPolice #CorruptionFreeIndia
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: