पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करा: खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी
पिंपरी-चिंचवड | २९ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराचा नागरी आणि औद्योगिक विस्तार झपाट्याने होत असून २०११ मध्ये १७ लाख असलेली शहराची लोकसंख्या आजमितीला तब्बल ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरी विस्तार, मेट्रो प्रकल्प, ऑटोमोबाईल हब आणि आयटी पार्क असूनही शहराचा टपाल कारभार अद्याप पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या अखत्यारीतच चालवला जात आहे. यामुळे निर्माण होणारा प्रशासकीय ताण आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी या संदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवदेन दिले आणि शहरातील प्रशासकीय अडचणींची माहिती दिली.
१९७० च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) पिंपरी-चिंचवड व लगतच्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहती विकसित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या भागाचे वेगाने औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झाले. सुरुवातीला नगरपालिका असलेल्या या परिसराचा १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा प्रवास झाला. आज हे शहर भारतातील एक अग्रगण्य औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, फिनोलेक्स यांसारख्या बलाढ्य उद्योगांनी शहराच्या विकासात पायाभूत योगदान दिले आहे. याचबरोबर हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि इतर सेवा क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशभरातून रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांचे पिंपरी-चिंचवड हे प्रमुख आकर्षणकेंद्र बनले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख होती, जी आज सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराचा विस्तार सुमारे ३४५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरला आहे. शहराची स्वतंत्र प्रशासकीय, औद्योगिक आणि आर्थिक ओळख निर्माण झाली असली, तरी टपाल प्रशासन मात्र अजूनही जुन्याच संरचनेत अडकलेले आहे. पुणे शहर पूर्व टपाल विभागांतर्गत पिंपरी-चिंचवडचा कारभार पाहिला जात असल्याने सेवा वितरणात अनेक अडचणी येत आहेत.
सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत १ मुख्य टपाल कार्यालय, ३० उपटपाल कार्यालये आणि ८ शाखा टपाल कार्यालये कार्यरत आहेत. या विस्तृत कार्यक्षेत्रामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आणि यंत्रणेवर प्रशासकीय कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. याचा थेट परिणाम टपाल वितरण, टपाल जीवन विमा (PLI), पार्सल सेवा आणि बचत योजनांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. लहान-सहान तक्रार निवारण, दावे किंवा प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना पुण्यातील मुख्यालयात जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो.
या सर्व बाबींचा विचार करून सध्याच्या पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे तातडीने विभाजन करावे आणि स्वतंत्र पिंपरी-चिंचवड टपाल विभाग स्थापन करावा, असे खासदार बारणे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
स्वतंत्र टपाल विभाग स्थापन झाल्यास होणारे मुख्य फायदे:
प्रशासकीय कार्यक्षमता: टपाल वितरण, पार्सल सेवा आणि डिजिटल टपाल सेवा अधिक गतीमान होतील.
नागरिकांची सोय: तक्रारींचे निवारण, टपाल बचत खात्यांचे दावे आणि इतर तांत्रिक कामांसाठी पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे प्रवासाचा वेळ व खर्च वाचेल.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी: केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि टपाल पेमेंट बँकेच्या सुविधा थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचतील.
कामकाजावरील देखरेख: स्वतंत्र अधीक्षकांची (Superintendent) नियुक्ती झाल्याने स्थानिक पातळीवर नियंत्रण आणि कर्मचारी कल्याणविषयक निर्णय तातडीने घेता येतील.
नवी दिल्लीतील या भेटीदरम्यान केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
Labels: Pimpri Chinchwad News, Postal Department, Srirang Barne, Jyotiraditya Scindia, PCMC News, Indian Postal Circle, Pune Postal Division
Search Description: Maval MP Srirang Barne meets Union Telecom Minister Jyotiraditya Scindia demanding an independent Postal Division for Pimpri Chinchwad's 30 lakh population.
Hashtags: #PimpriChinchwad #SrirangBarne #IndiaPost #JyotiradityaScindia #PCMC #PostalDepartment #Maval
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: