कासव संवर्धनात रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल; तर सर्वाधिक ६९.९५ टक्के उबवण क्षमतेसह सिंधुदुर्गची बाजी

 


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कासव संवर्धनाचा ऐतिहासिक टप्पा; १.०८ लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले पिल्ले समुद्रात झेपावली

रत्नागिरी, दि. १६ जून २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या 'ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन' कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या चालू हंगामात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अभूतपूर्व यश आले आहे. राज्यातील एकूण ५६ समुद्रकिनाऱ्यांवर मिळून १७२४ कासवांच्या घरट्यांची अधिकृत नोंद करण्यात आली असून, या घरट्यांमधून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या चिमुकल्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात यंदा सरासरी उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी ही ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे या यशस्वी आकडेवारीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या मोहिमेत महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्याने संवर्धनात अग्रस्थान पटकावले असून, येथे सर्वाधिक ९६४ घरटी नोंदवण्यात आली आणि त्यातून ५४,२२७ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांमधून ५३,३२५ पिल्ले समुद्रात झेपावली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६९.९५ टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदवले आहे. रायगड जिल्ह्यात २२ घरट्यांच्या नोंदीसह १,०४४ पिल्लांना जीवनदान मिळाले. यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड़, सालदुरे/पानंदे व कचरे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांच्या घरट्यांची नोंद झाली असून, यामुळे संवर्धनाची व्याप्ती वाढली आहे.

सागरी परिसंस्थेच्या संतुलनात ऑलिव्ह रिडले कासवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत त्यांना संरक्षित प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी २०१८ पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांसाठी विशेष नुकसान भरपाई योजना राबवली जात आहे. मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या कासवांना व इतर प्राण्यांना आपले महागडे जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छिमार बांधवांना वन विभागाकडून भरपाई दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४८६ समुद्री कासवांना वाचवण्यात यश आले असून, मच्छिमारांना एकूण सुमारे ६१ लाख २१ हजार ८५० रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पावसाळ्यात किनाऱ्यावर जखमी अवस्थेत वाहून येणाऱ्या कासवांवर तात्कालिक उपचार करण्यासाठी 'मरीन रिस्पॉडंट गटाची' स्थापना करण्यात आली असून, डहाणू येथील उपचार व संक्रमण केंद्रासह मुंबईजवळील ऐरोली येथे भव्य कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे; तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामस्थ, कासव मित्र, मच्छीमार आणि स्वयंसेवी संस्थांच्या सामूहिक लोकसहभागामुळेच हा संवर्धन उपक्रम देशात आदर्श ठरत आहे.


  • Labels: Olive Ridley Conservation 2026, Maharashtra Mangrove Cell, Ratnagiri Sea Turtle Hatchlings, Konkan Coast Wildlife Protection, Sindhudurg Turtle Conservation, Astra News Network

  • Search Description: Over 1.08 lakh Olive Ridley sea turtle hatchlings successfully released across 56 beaches in Maharashtra during the 2025-26 season, with Ratnagiri leading the records.

  • Hashtags: #OliveRidley #SeaTurtleConservation #RatnagiriNews #MangroveCell #SindhudurgTourism #KonkanWildlife #EnvironmentNews #AstraNewsNetwork

कासव संवर्धनात रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल; तर सर्वाधिक ६९.९५ टक्के उबवण क्षमतेसह सिंधुदुर्गची बाजी कासव संवर्धनात रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल; तर सर्वाधिक ६९.९५ टक्के उबवण क्षमतेसह सिंधुदुर्गची बाजी Reviewed by ANN news network on ६/१६/२०२६ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".