मावळात विकासकामांना गती द्या, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या कडक सूचना
मावळ, दि. १९ जून २०२६ : मावळ विधानसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध मोठ्या विकास कामांना प्रशासनाने तात्काळ गती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत कामाचा दर्जा राखावा, असे कडक निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत. मान्सूनच्या तोंडावर तालुक्यातील सर्व पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते आणि बी-बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. मावळ तालुक्याची सर्वंकष आढावा बैठक आज, शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात पार पडली, त्या दरम्यान ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या बैठकीला आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, मावळ पंचायत समिती सभापती सुनिता येवले, उपसभापती साहेबराव कारके यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शिक्षण, अंगणवाडी, कृषी, आरोग्य आणि स्थापत्य विषयक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यात जलजीवन मिशनची मोठी कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. या कामांचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असून ती विहित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत. घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या ना-हरकत दाखल्यांच्या त्रुटींवर बोट ठेवत, पीएमआरडीए आणि वन विभागाकडून दाखले मिळण्यास होणारा विलंब थांबवून नागरिकांना ते तत्काळ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यांच्या कामांबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचे आदेश त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा दर्जेदार करून रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचे अतिरिक्त मनुष्यबळ लवकरच पुरवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नालेसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे आदेश देताना, सखल भागात पाणी साचणार नाही आणि साचलेले पाणी तातडीने उपसले जाईल याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत खतांचा पुरवठा करावा आणि हवामान खात्याचे पावसाचे अपडेट्स सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत, अशी सूचना त्यांनी केली. फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या १३ जणांच्या मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत खासदार बारणे यांनी मावळ तालुक्यात अवैध धंदे संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित पोलीस व महसूल प्रशासनाला दिले.
या बैठकीला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, ज्यामध्ये जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल शिंदे, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राम सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, मनीषा मुर्हे, पल्लवी दाभाडे, अनंत पावशे तसेच पंचायत समिती सदस्य प्राची गायकवाड, दिलीप शिंदे, राजेंद्र कडलक, शैला कालेकर, आशा मोरमोर, रेश्मा देवकर, योगेश लोहर, युवासेना तालुका प्रमुख विशाल लोखंडे, उपतालूका प्रमुख अमित कुंभार, धनंजय नवघने, सोमनाथ कोंडे आणि मदन शेडगे उपस्थित होते.
Labels:
Maval Review Meeting,Srirang Barne MP,Sunil Shelke MLA,Jal Jeevan Mission Maval,Pre Monsoon Works Pune 2026Search Description: MP Srirang Barne conducts Maval review meeting, ordering administration to speed up development works, complete desilting, and book drug peddlers under MCOCA.
Hashtags: #MavalNews #SrirangBarne #DevelopmentWorks #PreMonsoonPreparation #ActionAgainstIllegalLiquor #AstraNewsNetwork
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: