मुंबई, दि. २१ :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' या टीकेचा भारतीय जनता पक्षाने अत्यंत तीव्र शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे. "संजय राऊत यांनी भाजपवर भाष्य करण्यापेक्षा 'मूर्ख आणि मंद जनता पार्टी' स्थापन करून तिचे स्वयंघोषित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावे आणि या पक्षाचे चिन्ह 'गाढव' ठेवावे, तिथेच त्यांची पात्रता सिद्ध होईल," असा घणाघाती पलटवार भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीसह काँग्रेसच्या कथित देशविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.
राहुल गांधींचे समर्थन केल्यास पक्षाची अधिक वाताहात होईल
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर देशाशी गद्दारी केल्याचा थेट आरोप केला. "या देशात चीनसोबत हातमिळवणी करून गद्दारी करण्याचे काम काँग्रेसने अनेकदा केले आहे. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्या आणि परकीय निधीवर चालणाऱ्या काँग्रेसने भाजपला गद्दार म्हणू नये," असे बन म्हणाले. पुढे संजय राऊत यांना इशारा देताना ते म्हणाले की, जर राऊत अशा देशविरोधी वक्तव्यांचे आणि राहुल गांधींचे समर्थन करणार असतील, तर आगामी काळात त्यांच्या पक्षाची उरलीसुरली ताकदही नष्ट होईल आणि त्यांची प्रचंड वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही.
खासदार निधी आणि उपस्थितीचे 'रिपोर्ट कार्ड' दाखवण्याचे आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे रिपोर्ट कार्ड जनता स्वतः तपासते आणि म्हणूनच त्यांनी भाजपला वारंवार निवडून दिले आहे, असा दावा बन यांनी केला. संजय राऊतांना लक्ष्य करत ते म्हणाले, "तुमचे रिपोर्ट कार्ड तर अपयशाचे, घोटाळ्यांचे आणि महिलांना धमक्या देण्याचे आहे. जनतेने ते पाहिले तर तुम्हाला मुंबई महापालिकेच्या एका वॉर्डातही निवडून येता येणार नाही. खासदार निधीतून जनतेच्या हिताचे केलेले एकतरी काम राऊतांनी दाखवावे." तसेच, उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील उपस्थितीचे रिपोर्ट कार्ड अवघे ३१ टक्के असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
'जय श्रीराम'चा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार:
"संजय राऊत यांच्यासाठी 'जय श्रीराम' हा भ्रम असेल, पण आमच्यासाठी ते सत्य आहे. यापूर्वी काँग्रेसने प्रभू रामचंद्रांना काल्पनिक म्हणून अपमान केला होता, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. आता जर उबाठा गट याच मार्गाने जाणार असेल, तर जनता आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून पुन्हा घरी बसवेल," असा थेट प्रहार नवनाथ बन यांनी केला.
Labels
Sanjay Raut BJP Dispute, Navnath Ban Press Conference, Maharashtra Politics, BJP vs Shiv Sena UBT, Rahul Gandhi Controversy, Mumbai Political News
Search Description
BJP state chief spokesperson Navnath Ban slammed Sanjay Raut over his recent remarks. Ban suggested Raut to establish a party of fools and keep donkey as its symbol, challenging his performance card as an MP.
Hashtags
#SanjayRaut #NavnathBan #BJPMaharashtra #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MumbaiPressConference #PoliticalWarOfWords
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२६ ०९:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: