'नीट' पेपरफुटीचा खरा सूत्रधार काँग्रेसच्या दावणीला; संजय राऊतांनी अमित देशमुखांना प्रश्न विचारावेत: नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई: 'नीट' (NEET) पेपरफुटीप्रकरणी भारतीय जनता पक्षावर बेताल आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी लातूरमधील मुख्य आरोपीच्या अटकेवरून काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारावेत, असा घणाघाती हल्ला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी येथे केला. लातूरमध्ये अटक झालेला आरोपी शिवराज मोटेगावकर हा काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा खंदा समर्थक असून, त्याने निवडणूक काळात काँग्रेसचा प्रचार केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्यांची आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी बन यांनी केली. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'नीट' पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर केंद्र सरकार आणि सीबीआयच्या माध्यमातून कडक कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट करत नवनाथ बन म्हणाले की, सरकार या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाजपा पूर्णपणे तरुणांच्या पाठीशी उभी आहे. मात्र, काही ठिकाणी काँग्रेस आणि नीट पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत असताना संजय राऊत यावर मौन का बाळगून आहेत, असा सवाल त्यांनी केला. राऊतांनी आधी काँग्रेस आणि अमित देशमुख यांना प्रश्न विचारावेत आणि नंतर भाजपावर टीका करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
याच पत्रकार परिषदेत बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर इतर मुद्द्यांवरूनही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे लंडनवारीसारखे वैयक्तिक दौरे करत नाहीत. त्यांच्या दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवर भारताचे नेतृत्व बळकट होते. याउलट, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा उद्धव ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात होते."
संजय राऊत यांच्या न्यायालयीन विश्वासार्हतेवर बोट ठेवत बन यांनी टोला लगावला की, राऊत यांचा देशातील सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नव्हता आणि आता आंतरराष्ट्रीय किंवा अमेरिकेच्या न्यायालयावरही नाही. एका बाजूला मोदींना अमेरिकेचे गुलाम म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी अमेरिकेतील खटला मॅनेज केला असा आरोप करायचा, हा राऊत यांचा दुटप्पीपणा आहे. जनतेने आता त्यांना नाकारले असून, त्यांना न्याय मिळवण्यासाठी अंतराळवीर होऊन अंतराळातील न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, अशी खोचक टीका नवनाथ बन यांनी शेवटी केली.
Labels: Politics, Maharashtra News, BJP vs Shiv Sena UBT, NEET Paper Leak Controversy, Navnath Ban, Sanjay Raut
Search Description: BJP state chief spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut over NEET paper leak case, questions connections with Congress leader Amit Deshmukh and accused Shivraj Motegaonkar.
Hashtags: #NEETPaperLeak #MaharashtraPolitics #SanjayRaut #BJPSpokesperson #NavnathBan #LaturNEETScam #PoliticalClash
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२६ ०३:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: