सनातन संस्थे’ला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस (VIDEO)
मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर वाद
मुंबई, (प्रतिनिधी): मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर ‘भगवा दहशतवाद’वरून ‘सनातनी दहशतवाद’ असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सनातन संस्थेने १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी बिनशर्त माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणू नका, तर 'सनातनी दहशतवाद' म्हणा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना ‘मी सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ म्हटले, धर्माला नव्हे’, असे म्हटले होते. हे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप सनातन संस्थेने केला आहे. संस्थेचे विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्या वतीने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या नोटिसीमध्ये, पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागावी, ती माफी मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने प्रसिद्ध करावी, भविष्यात अशी बदनामीकारक विधाने करू नये आणि कायदेशीर खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी ही नोटीस दिली आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यात म्हटले आहे.
प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितले की, "मालेगाव प्रकरण झाले, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. त्यावेळी चव्हाण यांना 'भगवा' हा छत्रपतींचा आणि संतांचा आहे हे आठवले नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Sanatan Sanstha
Prithviraj Chavan
Defamation Notice
Legal Action
Controversy
#SanatanSanstha #PrithvirajChavan #Defamation #LegalNotice #MaharashtraPolitics #Controversy

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: