२ लाखांच्या पाच दुचाकी जप्त; चोरट्यांकडून गुन्ह्याची कबुली
पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गस्तीदरम्यान, मोटारसायकल चोरणाऱ्या एका त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण २ लाख रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली जप्त केल्या असून, त्यांच्या अटकेमुळे आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
२७ जुलै २०२५ रोजी आंबेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांचे पथक जांभुळवाडी तलाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना आंबेगाव गावठाणकडे संशयास्पदरित्या जाणाऱ्या तीन तरुणांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नरेंद्र सुखदेव झुरंगे, सुयश सुनिल दुधाळ आणि प्रज्वल गंगाधर टिळेकर अशी सांगितली.
पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल अशा एकूण ५ दुचाकी जप्त केल्या, ज्यांची किंमत २ लाख रुपये आहे.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या पथकाने केली.
Pune Police
Motorcycle Theft
Ambegaon Police Station
Arrest
#PunePolice #MotorcycleTheft #Arrest #CrimeNews #AmbegaonPolice #PuneCity #VehicleTheft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: